शिवाजी व्यापारी संकुलातील वीजवाहक वायर्स ग्राहकांच्या जीवावर

0

भुसावळ नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; दुर्देवी घटना घडल्यास जबाबदार कोण?

भुसावळ- शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये देखभालीअभावी अनेक असुविधा निर्माण झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचाही समावेश आहे. या व्यापारी संकुलातील वीज वाहक वायर्स देखभालीअभावी डोक्यापर्यंत लोेंबकळत आल्याने ग्राहक आणि व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत. वर्षाकाठी लाखो रुपयांचे भाडे वसुल करणार्‍या पालिका प्रशासनाचे या धोकेदायक प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून विविध भागात मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत मात्र बहुतांश व्यापारी संकुलांमध्ये असुविधा निर्माण झाल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचाही समावेश आहे. या व्यापारी संकुलामध्ये व्यापार्‍यांसाठी वीज जोडणी देण्यात आली आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून वीज वाहक तारा देखभालीअभावी व्यापारी आणि व्यापारी संकूलामध्ये येणार्‍या ग्राहकांच्या डोक्यापर्यंत लोंबकळू लागल्या आहेत. यामुळे ग्राहक आणि व्यापार्‍यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे मात्र या धोकेदायक प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जीवीतहानीची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने असा प्रकार घडल्यास घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. नगरपालिका प्रशासनाने या प्रकाराकडे जातीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अस्ताव्यस्त लागणार्‍या वाहनांमुळे संताप
व्यापारी संकूलामध्ये व्यापारी व ग्राहकांची वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध असलीतरी या वाहनतळाचा व्यापारी व ग्राहकांऐवजी बाहेरगावी रेल्वे अथवा बसने जाणारे चाकरमानेच आपली वाहने सकाळीच लावून जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहर वाहतूक शाखेने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केवळ कर वसूली
पालिका प्रशासनाच्या माध्यमातून व्यापारी संकूलातील गाळेधारकांकडून नियमित कराची वसूली केली जाते मात्र गाळेधारकांना अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गाळेधारक व्यापार्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिका प्रशासनाला दरवर्षी या गाळ्यांच्या माध्यमातून लाखोंचे भाडे व कर स्वरूपात महसूल मिळतो मात्र सुविधा पुरवण्याबाबत असलेली एकूणच बेफिकीरी व्यापार्‍यांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.

संकुलातील स्वच्छतागृहाची दुरवस्था
सर्वाधिक गजबजलेल्या व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रात्री विजेचा अभाव असून पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनदेखील तुटल्याने व्यापार्‍यांसह ग्राहकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या गप्पा करणार्‍या सत्ताधार्‍यांसह पालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.