धुळे । शहरातील पाच कंदिल भागात असलेल्या शिवाजी मार्केट आणि शंकर मार्केट मधील गाळेधारकांना मनपाचा कर न भरल्याने संपुर्ण मार्केटलाच सील ठोकण्याची कारवाई 29 रोजी मनपाच्या पथकाने केली. या दोन्ही मार्केटमधील गाळेधारकांकडे कोट्यांवधींची रक्कम थकीत असून त्यांनी किमान 60 टक्के रक्कम भरावी असा मधला मार्ग मनपाने सुचविला आहे. पाचकंदिल चौकात असलेल्या शिवाजी मार्केट व शंकर मार्केट येथे प्रत्येकी 68 गाळे असून मार्केटच्या बाहेर 20 दुकाने आहेत. यातील शंकर मार्केट मधील गाळेधारकांकडे सुमारे 56 लाख रुपये तर शिवाजी मार्केटमधील गाळेधारकांकडे 1 कोटी 75 लाख रुपयांची थकबाकी आहे. हे दोन्ही मार्केट मनपाच्या मालकीची असून तेथे अद्ययावत व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन मनपाचे आहे.
मनपा पथकास व्यापार्यांचा विरोध
मनपा व गाळेधारकांमध्ये झालेला करारही संपला असून मनपाने सदर दुकानदारांना दुकाने खाली करण्याचा आदेश दिला होता. मात्र येथील व्यापार्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होते.व्यापर्यांनी न्यायलयात याचिका दाखल केल्याने हे गाळेधारक मनपाचा करच भरत नव्हते. न्यायालयात मनपाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर मनपाने जागा खाली करण्याचा तर व्यापार्यांनी भाडे वाढीचा प्रस्ताव दिला होता. मात्र यावर एकमत न झाल्याने तसेच दुकानदारांनी दुकान खाली न करता कराची थकबाकी ठेवल्याने आज या मार्केटला सील ठोकण्याचा निर्णय देण्यात आला होता. यानुसार महानगर पालिकेकडून दुकांनाना सील करण्यास पथक गेले असता व्यापार्यांनी त्यांना विरोध केला होता.
दुपारपर्यंत 60टक्के रक्कम भरण्याची मुभा
यावेळी उपायुक्त रविंद्र जाधव, सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, नंदु बैसाणे, नारायण सोनार, अनिल बगदे, पी.डी. चव्हाण, सुनंद भामरे, मधुकर निकुंभे, राजेंद्र कदम, जगन ताकटे, दिलीप कलाल, अयुब पिंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी व्यापार्यांनी मनपाच्या पथकाशी वादही घातला. शेवटी पोलीस आल्याने हा वाद मिटून कारवाई पुर्ण करण्यात आली. दरम्यान मनपाने या व्यापार्यांना थकीत रकमेच्या 60 टक्के रक्कम भरुन उर्वरित रक्कम भरण्याला मुदत देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत पैसे भरल्यास सायंकाळी हे मार्केट पुन्हा खुले केले जाण्याची शक्यता आहे.