चाकण : घराच्या दरवाज्याची आतून लावलेली कडी शिताफीने उघडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, असा तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना खेड तालुक्यातील शिवे येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. चाकण पोलिसात याप्रकरणी रामदास बबन सातपुते (40, रा. शिवे, ता. खेड) यांनी तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवे येथे रात्री सातपुते कुटुंबीय आपल्या घराच्या कड्या आतून लावून झोपलेले असताना घराच्या किचनचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी उघडून त्याद्वारे घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे 30 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, प्रत्येकी 25 ग्रॅम व 35 ग्रॅम वजनाचे राणीहार व लॉकेट, चार तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याची अंगठ्या, लहान मुलांच्या गळ्यातील बदामी लॉकेट, पायातील पैंजण, कॅनन कंपनीचा महागडा कॅमेरा, अप्पल, ओपो व सॅमसंग कंपन्यांचे महागडे मोबाईल, असा तब्बल 3 लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सकाळी साडेसहा वाजता घरातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर रात्री गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
घरफोड्या टोळ्यांना जरब हवी
चाकण परिसरात घरफोड्या आता सहज होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्या होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. म्हाळुंगेमध्ये अशाच घटनेत दोन महिन्यांपूर्वी एका शेतकर्याला चोरट्यांनी ठार केल्याची घटना समोर आली होती. रात्री घरफोड्या करून निर्ढावलेले चोरटे भरदिवसाही घरफोड्या करू लागले आहेत. चाकणमध्ये मागील काही दिवसांत घरफोड्या दिवसाही झाल्या आहेत. दिवसा आणि रात्री गस्तीसाठी पुरेसे पोलीस बळ नसल्याने होणार्या दुर्लक्षामुळे चाकण पंचक्रोशीत चोर्या घरफोड्या वाढल्या आहेत. घरफोड्या टोळ्यांना पोलिसांनी चाप लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.