मुंबई | “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पक्षनेतेपदाचा कधीच राजीनामा दिलाय. त्यामुळे मला नोटीस वैगेरे कसली? खुलासा कसला करायचा?” हे बोल आहेत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिशिर शिंदे यांचे. “विठ्ठल संतापला, बडव्यांची संस्थाने बरखास्त” अशी बातमी रविवारी ‘जनशक्ति’ने प्रसिद्ध केली होती. त्यावर शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशीच, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वत: राज ठाकरे यांच्याकडे दिल्याने कुठल्याही नोटिशीवर खुलाशाचा प्रश्नच उरत नाही, असे ते म्हणाले. सध्या मी नेता वैगेरे काही नसून केवळ मनसेचा कार्यकर्ता आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सध्या मी झाडे लावण्याचा उपक्रम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
मनसे नेते ‘नॉट रिचेबल’
मनसेतील दुसऱ्या फळीची दिग्गज नेतेमंडळी पक्षातील या बदलांवर बोलायला दिवसभर ‘नॉट रिचेबल’ राहिली. तर काहींनी पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे, म्हणत उघड नाराजी दाखविली नाही. न दाखवता मात्र, यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे म्हणत ‘जनशक्ति’च्या प्रतिनिधीचा कॉल ‘कट’ केला. बाळा नांदगावकर यांनी बदलांवर भाष्य करणे टाळले, तर सरदेसाई यांनी या निर्णयामुळे बॅकफूटवर गेलो नसल्याचे म्हटले. शिशिर शिंदे आणि संदीप दळवी यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे, नव्या दमाच्या शिलेदारांनी मात्र मिळालेल्या संधीचे सोने करू, असे म्हणत मनसेच्या इंजिनाला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पक्षाला उभारी देण्यात अपयशी
शिवसेनेला रामराम करून मनेसमध्ये आलेल्या जुन्या सहकाऱ्यांना पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतून वगळ्यात आले आहे. त्यात बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी या चौघांचा समावेश आहे. हे चौघेही राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र पक्षाला उभारी देण्यात हे चौघेही कमी पडल्याने राज ठाकरे यांनी हा कठोर निर्णय घेतला.
निष्ठावानांना मिळाली संधी
जुन्या सहकाऱ्यांच्या जागी कार्यकारिणीत संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, संजय नाईक आणि नंदू चिल्ले या चौघांची नेमणूक करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून संदीप देशपांडे यांना नेमण्यात आले आहे. बाळा नांदगावकर यांचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या उलटफेरामुळे मनसेतील नाराजां च्या संख्येबरोबरच पक्ष सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण अजून वाढेल की नव्या माणसांमुळे पक्षाला उभारी येईल, याकडे लक्ष लागून आहे, कोट/ शिशिर शिंदे “पक्षांमध्ये निकटवर्तीय वगेरे काही नसते. कुठल्याच पक्षाच्या नेत्याला गटबाजी अपेक्षित नसते. माझ्याबाबत माध्यमात चर्चा होतेय तसे काहीही झालेले नाही. मी राजीनामा देऊनही माझ्या नावाचा बातम्यांमध्ये नाहक
उल्लेख केला जातोय. मी नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येक गोष्ट राजकारण म्हणून पहिली जाऊ नये.”
– शिशिर शिंदे, मनसे
पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांना पक्षाचे हित चांगलेच माहिती आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पक्षात काय बदल करायचे, कुणाला काढायचे, कुणाला बढती द्यायची हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांना आहे. त्यांनी काहीही निर्णय घेतले तरी आम्हाला मान्य असून सदैव त्यांच्यासोबत आहोत.
– बाळा नांदगावकर,
मनसे नेते
पक्षांतर्गत बदल हे नियमित होत राहतात. पक्षात ज्यांनी काम केलेय त्यांना बढती मिळालीय पण यामुळे माझ्या स्थानाला कुठलाही धोका नाही. पक्षात राहूनच यापुढेही राजसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष विस्तारासाठी काम करणार आहे. मी मनसे नेता म्हणूनच राहील.
– नितीन सरदेसाई,
मनसे नेते