वाशी : मनपाने वाशी येथे सुसज्ज रुग्नालाय बांधून 17 वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. परंतु अनेक कारणाने हे रुग्णालय वादाच्या भोवर्यात सापडत आहे. त्यातच आता रुग्णालयातील शिशु अतिदक्षता विभागात असलेल्या एकूण चार जीवन प्रणाली यंत्रणाच बंद असल्याची बाब समोर आली आहे. ही जीवनप्रणाली बंद असताना आरोग्य विभाग झोपले होते काय? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. या ठिकाणी जन्मताच आजारी, श्वास घेण्यास त्रास, सात महिन्यातच जन्माला आलेल्या शिशुंना उपचार करण्यात येत असते. परंतु जी मूल जन्मताच अत्यवस्थ असतात त्यांना जीवन प्रणाली यंत्रेनेवर ठेवले जाते. परंतु येथे असणार्या यंत्रणाच बंद असल्यामुळे अनेक वाईट घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मनपा नगरसेवक, आरोग्य विभाग किती चाणाक्षपणे काम करतय हे सिद्ध झाल्याचे मत भाजप प्रभाग अध्यक्ष रवींद्र राजीवडे यांनी व्यक्त केले आहे.
विनामूल्य सेवांमुळे नागरिकांचा कल सरकारी रुग्णालयांकडे
कोणत्याही सरकारी रुग्णालयात जाणारा रुग्ण हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारा जातो. त्यातल्या त्यात मनपाच्या रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरीब व गरजू नागरिक याच रुग्णालयाची वाट धरतात. त्यामुळे सरकारी रुग्णालयाकडे नागरिकांचा लोंढा जास्त असतो. खाजगी रुग्णालयात शिशु अतिदक्षता विभागात एखाद्या शिशुला दाखल केल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च अपेक्षित असतो. मनपा रुग्णालयातील ही अत्यावश्यक सेवाच बंद असल्यामुळे काही पालकांना आपले सोन, घर तारण ठेवण्याची परिस्थिती आल्याचे सांगण्यात येत आहे.
काही पालकांची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असल्यामुळे त्यांच्या कडून कोणतेही उपचार होत नसल्यामुळें आपलं बाळ गमावण्याची पाळी देखील आल्याच्या घटना घडल्या आहेत.
– रवींद्र राजीवडे, अध्यक्ष, भाजप प्रभाग
मागील स्थायी समिती बैठकींमध्ये यंत्रणा घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या दहा दिवसात यंत्रणा सुरु होईल.
– दीपक परोपकारी, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी