शिष्यवृत्तीबाबत अभाविपचे आंदोलन

0

पुणे । शासनाकडून देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुलभ व सुकर करावी तसेच थकीत शिष्यवृत्ती त्वरित मिळावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोमवारी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांना देण्यात आले.

महागडे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीवर अवलंबून राहावे लागते. बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आवश्यक आहे. शासन एका बाजूला विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची घोषणा करत आहे. परंतु घोषित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्ष उलटून जात आहेत. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, समाजकल्याण तसेच शासनाच्या विविध कार्यालयातून खेटे मारावे लागतात. काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. फॉर्म भरण्याची संकेतस्थळे अद्ययावत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत असून त्याचा विद्यार्थ्यांना अत्यंत त्रास सोसावा लागत आहे.

शिष्यवृत्ती थकीत ठेवणे अन्यायकारक
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा विचार करता फॉर्ममध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत ठेवणे हे अन्यायकारक असून त्याची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविप पुणे महानगर मंत्री राघवेंद्र रिसालदार यांनी दिला आहे.