पुणे : महापालिकेतर्फे दिल्या जाणार्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेतर्फे दहावी आणि बारावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे होते. याची मुदत 28 ऑगस्टपर्यंत होती. या अर्जासोबत महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे आवश्यक होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची अद्यापही महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे अर्जासोबत जोडावयाचा पुरावा देणे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. तसेच यामुळे ते मुदतीत अर्ज भरू शकले नाहीत. ही अर्जाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याला 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी सुतार यांची मागणी आहे.