शिष्यवृत्तीसाठी रास्ता रोकोचा इशारा

0

मनसेतर्फे तळोदा प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे इशारा; वर्ष संपत आले तरी शिष्यवृत्तीपासून वंचीत 

विद्यार्थी दैनंदिन खर्च कसा करावा या विवेंचनेत ; पालकांनाही भेडसावत आहे पैशांची चिंता

शहादा । नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही ती लवकर मिळावी अन्यथा 12 सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा सचिव मनलेश जयस्वाल यांनी प्रकल्प अधिकारी तळोदा यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यांतील आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपत आलेले असतांना विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना वर्ष संपण्यात येवूनही शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याने त्यांना आपला खर्च कसा उलचवा याची चिंता सतावत आहे.

ऑनलाईन सबमिशन
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून शासनातर्फे आदिवासी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व निर्वाह भत्यापोटी शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या, विमुक्त, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे शिषवृत्ती मिळते. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती अदा केली जाते. शिष्यवृत्ती योजनेतील गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून ऑनलाईन फार्म भरले जात आहेत.

शाळा, महाविद्यालयांना अद्यापही शिष्यवृत्ती प्राप्त नाही
गत शैक्षणिक वर्ष संपले असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विद्यार्थी व पालकांतर्फे नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित शाळा – महाविद्यालयातून अधिक माहिती घेतली असता एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजी पहावयास मिळत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत आहे. शिष्यवृत्ती योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत. परंतु, फॉर्म भरूनही वेळेवर शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने सर्वत्र नाराजी पसरली आहे. ऑनलाईन पद्धतीद्वारे शिष्यवृत्ती फॉर्म भरल्याने शिष्यवृत्ती मिळतांना गैरप्रकार होणार नाही अशी आशा विद्यार्थ्यांना होती. परंतु, ऑनलाईन सबमिट करूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

वारंवार माणगी करूनही दुर्लक्ष
नंदुरबार जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना त्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून विनाकारण वंचित रहावे लागत आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक समस्या जाणवत असून एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग तळोदा व नंदुरबार यांनी त्वरित दखल घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मिळावी यासाठी वारंवार पाठपुराव करण्यात आला आहे. यात 3 मे रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र तीन महिने उलटूनही अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. वारंवार पाठपुराव करूनही शिष्यवृत्ती मिळत नसल्याने शेकडो विद्यार्थी व पालकांसह शहादा – प्रकाशा रस्त्यावर 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे होणार्‍या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन मनसे जिल्हा सचिव जयस्वाल यांनी केले आहे.

विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात
शिष्यवृत्तींची वारंवार मागणी करूनही विद्यार्थ्यांना अद्यापही मिळालेले नाही. अशा या परिस्थितीमुळे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत. शिष्यवृत्ती मंजूर व्हावी यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसेचे जिल्हा सचिव जयस्वाल यांनी तळोदा प्रकल्प अधिकारी यांना भेटून विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावा अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे.