‘शिसाका’ सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने कार्यवाहीची माहिती द्यावी

0

शिरपूर। शिरपूर तालुक्यातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने केलेल्या कार्यवाहीची माहिती जाहीर करावी यासाठी शेतकर्‍यांच्या वतीने येथील शेतकरी विकास फाऊंडेशनने शिसाकाचे चेअरमन माधवराव पाटील यांना करवंद नाक्यावरील डी.एड. कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या शिसाकाच्या कार्यालयात हे निवेदन दिले. यावेळी व्हा.चेअरमन दिलीप पटेल यांची उपस्थिती होती. या संदर्भातचा खुलासा येत्या आठवड्या भरात दिला नाही. तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या शेवटी दिला आहे.

कारखाना शेतकर्‍यांसाठी महत्वाचा
साखर कारखाना हा येथील शेतकरी, शेतमजुर यांच्यासह तमाम जनतेचा जिव्हाळ्याचा व जिवन मरणाचा प्रकल्प आहे. असे असतांनाही सभासदांनी विश्‍वास टाकून आपल्या हाती. सत्ता सोपविली परंतु आपण कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने जाणीव पुर्वक टाळाटाळ करीत आहात. या सर्व भुमिकांचा सविस्तर खुलासा होणे गरजेचे आहे.

एक वर्ष होवूनही कारखाना सुरू होण्याचे चिन्हे नाहीत
साखर कारखान्याची निवडणूक होवून आता जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटला असून देखील कारखाना सुरू करण्यासंदर्भात कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. या विषयाला अनुसरून शेतकरी विकास फाऊंडेशनने अनेकदा लेखी निवेदने देवून देखील शि.सा.का.संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा खुलासा दिलेला नाही. तालुक्यातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍नाकडे शिसाकाने डोळेझाक केली आहे. त्याकरीता येणार्‍या काळात आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. निवडणूक काळात शिसाका सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्याने मतदारांनी सत्ता दिलेली असतांना देखील सन 2017-18 चा हंगाम सुरू करण्याचा काळही निघून चालला आहे. दिलेला शब्द पाळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रोव्हिडंट फंड प्रकरणास स्थगिती असून जिल्हा बँक जप्त केलेला कारखाना ताब्यात देण्यास तयार असून देखील तो ताब्यात घेण्यास नकार देवून टाळाटाळ का केली जात आहे? याचा खुलासा व्हावा.

निवेदनावर 111 शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष ठाणसिंग भास्कर पाटील, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक श्रीराम, सचिव अ‍ॅड. गोपालसिंग राजपूत, कोषाध्यक्ष उज्वलसिंग सिसोदिया, सदस्य दिलीप लोहार, मोहन पाटील यांच्यासह प्रा.पी.एस.अंतुर्लीकर, राजू टेलर, शांतीलाल पाटील, कोमलसिंग राजपूत, कर्मचारी देविदास माळी, राजेंद्र देवरे, शिवाजी बोरसे, ईश्‍वर पटेल, दिलीप पाटील, भालचंद्र पाटील, गोपीचंद जाधव, श्यामकांत मोरे यांच्यासह शेतकर्‍यांतर्फे हे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर फाऊंडेशनच्या सदस्यांसह सुमारे 111 शेतकर्‍यांची स्वाक्षर्‍या आहेत.