शिस्तबद्ध घराण्याची भाऊबंदकी!

0

सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचा गौरव ज्या पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे यांच्या नावावर जमा होतो. त्या विठ्ठलरावांच्या तिसर्‍या पिढीत आता भाऊबंदकी उफळली आहे. घराण्याचा नावलौकिक, दबदबा याचा अजिबात विचार न करता अशोकराव विखे-पाटील यांनी त्यांचे कनिष्ठ बंधू व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. दोन भावांतील हे भांडण केवळ संस्था, संपत्ती यांच्या वाटणीतून उद्भवल्याचे प्रथमदर्शनी दिसते. राधाकृष्ण विखे यांचा हव्यास आणि अशोकरावांचा शिघ्रकोपी स्वभाव अशा दोन्ही प्रवृत्तींचे प्रदर्शन या निमित्ताने झाले. हा वाद घरातील आहे अन् तो घराच्या उंबरठ्याच्याआतच मिटायला हवा. दुसरे असे की, असे काही झाले की पहिल्यांदा शरद पवारांकडे संशयाने पाहिले जाते. अशोकराव आक्रमक होण्यामागे पवारांचा काही हात आहे का? हेही तपासावे लागेल!

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

राज्यातील अत्यंत शिस्तबद्ध घराणे म्हणून विखे घराण्याकडे पाहिले जाते. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्याची दूरदृष्टी ज्या पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी दाखवली अन् देशातील सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली; त्या पद्मश्री विखेंच्या घराण्यात आता गृहकलह भडकला आहे. स्व. विठ्ठलराव विखे यांच्यानंतर या घराण्याचा दबदबा पद्मभूषण स्व. बाळासाहेब उर्फ एकनाथराव विखे यांनी टिकवून ठेवला; किंबहुना तो वाढविला. अहमदनगरच्या राजकारणात बाळासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम राजकारण असे समीकरण बनले होते. राजकारणात जेवढे करता येईल तेवढे प्रयोग त्यांनी केलेत; अन् त्यांचा प्रत्येक राजकीय प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टरविरोधक म्हणून बाळासाहेब ओळखले जायचे. या दोन नेत्यांनी एकाच पक्षात राहून आणि नंतर पवारांनी स्वतःचा पक्ष काढल्यानंतरही एकमेकांशी जोरदार शह-कटशहाचे राजकारण केले. या राजकारणातही बाळासाहेब पवारांना पुरून उरले. बाळासाहेबांचा राजकीय वारसा आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे चालवित आहेत. नगरच्या राजकारणात मुलगा राज्यात मंत्री, सून जिल्हा परिषदेची अध्यक्षा अशी सगळी राजकीय सत्तास्थाने बाळासाहेबांच्या ताब्यात होती. शिवाय, काँग्रेस पक्षात त्यांचा शब्द चालत होता. पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदारही ते ठरले होते. राजकारणात आणि पक्षात असा प्रचंड दबदबा असलेल्या या नेत्याच्या घरातही त्यांचाच शब्द अंतिम होता. राधाकृष्ण विखे यांच्याकडे राजकारण-कारखानदारी, अशोक विखे यांच्याकडे वैद्यकीय संस्था व इतर उद्योग अन् राजेंद्र विखे यांच्याकडे शैक्षणिक संस्था व इतर जबाबदारी अशी अलिखित वाटणीच त्यांनी करून दिली होती. गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी नगर जिल्ह्यासह मुंबई, पुण्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले. कारखानदारीच्या माध्यमातून रोजगार उभा केला. वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेचा लाभ गोरगरिबांना अगदी मोफत करून दिला. या सर्व संस्था आजरोजी उत्तमप्रकारे आपले काम करत आहेत. स्व. बाळासाहेब विखेंनी या संस्थांची वाटणी करताना सगळ्या मुलांना समानवाटा मिळेल अशी तरतूद केली होती. परंतु, हव्यास कशाला म्हणतात ते आता विखे भावांमधील वादातून प्रगट होतो आहे.

गत 23 फेब्रुवारीरोजी राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची सूत्रे स्वीकारली आणि या भावंडांमधील वाद उफळून आला. बुधवारी अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखेंवर जे आरोप केलेत ते अत्यंत गंभीर आहेत. या आरोपांची राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी करायलाच हवी. परंतु, हे सरकार अशी चौकशी करेलच याची काहीही खात्री नाही. तद्वतच राधाकृष्ण विखे हे खरेच भाजपचे कठपुतळी बाहुले आहेत का? याची समीक्षाही आता काँग्रेस नेतृत्वाने करायला हवी. राज्यभरात काँग्रेसचे जोरदार पानिपत झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. एकेकाळी राज्यातील सत्ता सांभाळणारा हा पक्ष इतका लयास कसा गेला? हा प्रश्‍न सर्वांना पडत होता. त्याचे उत्तर बुधवारी अशोक विखे यांच्या आरोपांत दडलेले दिसलेे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, नेमके अधिवेशनाच्या तोंडावर हे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसची अन् राधाकृष्ण विखे यांची मोठी नाचक्की राज्यात झाली. भाऊबंदकी हा प्रत्येक घराण्याला शापच असतो. तसेच थोड्याफार फरकाने ती प्रत्येकाच्या घरात असतेच. परंतु, असल्या भाऊबंदकीची भनकही कधी विखे घराण्याला लागू शकली नव्हती. नेमके तीच बाब आता बाळासाहेबांच्या पश्‍चात विखेविरोधकांच्या पथ्यावर पडणारी आहे. अशोक विखे यांनी जाहीर आरोप करण्यामागे कुणी बोलविता धनी आहे का? असा काही प्रकार राज्यात घडला की सगळ्यांचे डोळे बारामतीकडे वळतात! तसा काही प्रकार आहे का? अशोकरावांच्या पाठीमागे अन्य कोणती शक्ती आहे की? राधाकृष्ण विखेंकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या संतापातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आता नजीकच्या काळात मिळतील. दुसरा प्रश्‍न असा निर्माण होतो की, बाळासाहेब विखेंच्या निधनाला केवळ नऊ आठवडेच झाले आहेत. त्यांच्या पश्‍चात या संस्था ताब्यात घेण्याची घाई राधाकृष्ण विखे यांना का झाली? प्रवरा एज्युकेशन ट्रस्टची परस्पर बैठक घेऊन अशोकरावांच्या अनुपस्थितीत ही संस्था ताब्यात घेण्याचा खटाटोप त्यांनी का चालवला? या सगळ्या घडामोडी पाहाता, माझे ते माझेच अन् तुझे तेही माझेच; अशी अप्पलपोटी मानसिकता राधाकृष्ण विखे यांची झाल्याचे दिसते.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]विधिमंडळ विशेष बातम्या वाचण्या साठी ह्या लिंक वर क्लिक करा[edsanimate_end]

बहीण-भावांच्या, सुना-नातवंडांच्या खटल्यात राहाताना असा आत्मघाती विचार करून चालत नसते, हे राधाकृष्ण यांना कोण समजावून सांगेल. विखे हे फार मोठे घराणे आहे, त्यांचा आदर्श नेहमीच इतर कुटुंबांसमोर रहात असतो. बाळासाहेबांनी स्वतःच्या हयातीत करून दिलेली वाटणी आता राधाकृष्ण विखे यांनी मान्य करणे अन् सत्तेचा दुरुपयोग करून स्वार्थी भूमिका न घेणे हेच त्यांच्यासाठी शहाणपणाचे ठरेल. अशोकरावांनीदेखील घरातील भांडणे अशाप्रकारे चव्हाट्यावर आणून काय साधले आहे? मालमत्ता, संपती आणि संस्था यांच्यातील वाटणी चार भिंतीच्याआत बसूनही करता येते. तेथे समाधानकारक तोडगा निघत नसेल तर न्यायालयाचे दरवाजेही ठोठावता येतात. त्यासाठी सार्वजनिकरित्या आरोप करणे ही भूमिका चुकीची आहे. तिकडे बीडमध्ये शरद पवार यांनी मुंडेबंधुंत भांडणे लावली व एकत्र घर उभे फोडले. तसा काही नवा प्रयोग तर विखे घराण्याच्या बाबतीत राज्यात सुरू नाही ना? अशी शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकत आहे.