जळगाव | युवराज परदेशी : गेल्या दीड-दोन वर्षांपासून जळगाव जिल्हा भाजपाला गटबाजीची कीड लागली आहे. राज्यातील दोन वजनदार नेते असलेले माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यानंतरही त्यांच्यातील भांडण मुद्यांवरुन गुद्यांवर कधीच गेले नाही. ‘पार्टी विथ डिफरन्स’ची मर्यादा दोन्ही नेत्यांनी कसोशीने पाळली. एकमेकांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करतांनाही पक्षशिस्तीची चौकट दोन्ही नेत्यांनी मोडली नाही.
मात्र ज्या वाघ कुटुंबियांना भाजपाने भरभरून दिले, या कुटुंबातील उदय वाघ यांना जिल्हाध्यक्ष केले तर त्यांच्या पत्नी स्मिता वाघ यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून पाठविले. त्याच वाघ दाम्पत्याने लोकसभेचे तिकीट कापले म्हणून नाराजी अस्त्र उपसले. पक्षावर टीका करण्यापुरते मर्यादित न राहता उदय वाघ यांची पक्षाचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना चक्क व्यासपीठावरच मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. शिस्तबध्द पक्षाकडून बेशिस्त संघटनेकडे भाजपाची वाटचाल होत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघ सुरुवातीपासून चर्चेत
लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून जळगाव जिल्हा राज्यभर चर्चेत आहे. कधी एकनाथ खडसे पक्ष सोडणार का? तर कधी त्यांच्या स्नुषा तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापणार का? या चर्चा राज्यभर गाजत होत्या. हा वाद निवळत नाही तोच जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील यांचे वादग्रस्त छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला. निवडणूक तोंडावर आली असतांना हा प्रकार घडल्याने पक्षाने त्यांचे तिकीट कापून घाईघाईत आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर केले. त्यांनी नामनिर्देशन अर्जही दाखल केला मात्र दुखावलेल्या खासदार ए. टी. पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेत पक्षावर तोफ डागली. या षड्यंत्रामागे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा हात असल्याचा आरोप केला. वाघ यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्याने पक्षाने ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे वाघ दाम्पत्य दुखावणे सहाजिकच होते. मात्र तत्त्वांची ही लढाई मुद्यांवरुन गुद्यांवर येईल, याची पुसटशीही कल्पना विरोधकांनीही केली नसावी. परंतु वाघांनी ती फोल ठरवली, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही! गंभीर बाब म्हणजे हा प्रकार मंत्रिमंडळातील वजनदार सदस्य म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला.
या हाणामारीत महाजन यांच्या दबंग भूमिकेचे कौतुक करायलाच हवे. जेव्हा वाघ व त्यांचे समर्थक पाटील यांना मारहाण करत होते तेव्हा मंत्रीपदाचा ‘प्रोटोकॉल’ बाजूला ठेवत महाजन यांनी संतप्त कार्याकर्त्यांना पाटील यांच्यापासून दूर लोटले. दोन-तीन जणांना तर त्यांनी थेट व्यासपीठवरुन खाली ढकलले. माजी आमदारांच्या सुरक्षेसाठी खुद्द मंत्रीच मैदानात उतरल्याने इतरांनीही धाव घेतली व पुढील अनर्थ टळला. मात्र यामुळे भाजपावरील कलंक पुसला जाईल असे नाही. मुळात हा युतीचा मेळावा असल्याने महाजन यांच्यासह शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव यांच्यासह डझनभर नेते व्यासपीठावर उपस्थित असतांना जिल्हाध्यक्षांची माजी आमदारांना मारहाण करण्याची हिंमत होतेच कशी? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वाघ हे खडसे यांचे विरोधक तर महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. उदय वाघ जेव्हापासून खडसेंच्या विरोधात उघडपणे सक्रिय झाले तेव्हापासूनच पक्षातील त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली, यास योगायोग म्हणता येणार नाही. सोईच्या राजकारणात नजीकच्या काळात फायदा होत असला तरी भविष्यात त्याचे किती वाईट परिणाम होवू शकतात याची प्रचिती गिरीश महाजन यांना आजच्या ‘हाणामारी कांडा’मुळे आली असेलच! एकीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपासमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यात भाजपाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. हे हायव्होल्टेज प्रेशर सहन करण्याची ताकद उन्मेश पाटलांना मिळो, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.