मुक्ताईनगर- शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतुर्ली फाट्याजवळील लुकमान अॅण्ड फ्रुट कंपनीच्या गोडावुनमधील केळी पिकवण केंद्रातील शीतगृहात बुधवार, 18 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ईथीलीन सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी बुधवारी रात्री फॉरेंसिक प्रयोगशाळेचे अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली परंतु काहीच सापडले नसल्याने अधिकारी परत गेल्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडुकार यांनी सांगितले. अंतुर्ली फाट्याजवळ गट क्रमांक 533/1 मध्ये केळी पिकवण केंद्र असलेल्या लुकमान अॅण्ड फ्रुट कंपनीचे शेख लुकमान शेख ईस्माईल हे मालक आहेत. येथे एकुण 11 केळी पिकवण केंद्रासाठी शितगृह आहेत. पैकी शितगृह क्रमांक 5 , 6, 7 मध्ये 18 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याने अंतुर्ली येथील शिवाजी दगडू साळुंके (25), शेख शरीफ शेख खानु (43, रा.रसलपूर, ता.रावेर) व निवृत्ती देवीदास पाटील (47, रा.वारोली, जि.बर्हानपूर) हे तीघे स्फोटात ठार झाले तर शीतगृह एकच्या आत असलेला शेख हनीफ शेख हमीद हा जखमी झाला होात. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मालक शेख लुकमान शेख ईस्माईल हा स्फोटाच्या धक्क्याने आजारी पडले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कंपनीचे अधिकारी यांना बोलवुन घटनेची तपासणी करून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.