एरांडोल । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तालुक्यातील सर्व देशी विदेशी दारू विक्रीचे दुकाने तसेच बियर शॉपी बंद झाल्यामुळे शहरात दारूची काळ्या बाजारात विक्री सुरु असून दारूची विक्री करण्यासाठी विविध प्रकारच्या शीतपेयांच्या खाली बाटल्यांचा उपयोग केला जात आहे.
पोलीस प्रशासन व दारू बंदी खात्याच्या अधिकार्यांची दिशाभूल करून अवैध दारू विक्रेत्यांकडून दारूची जास्त दराने विक्री करण्यासाठी विविध प्रकारच्या नामी शक्कल लढविल्या जात आहेत. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानंतर शहरासह ग्रामीण भागातील परवानाधारक मद्य विक्रेत्यांनी दारूची विक्री बंद केली आहे. मात्र अवैध रित्या दारू विक्री करणार्या विक्रेत्यांनी पोलीस व दारूबंदी खात्याच्या अधिकार्यांची दिशाभुल करून विविध प्रकारच्य नामी शक्कल लढवून जास्तदराने विक्री सुरूच ठेवली आहे.
दारू भरून ठराविक ठिकाणी होते विक्री अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू विक्री साठी शीत पेयांच्या खाली बाटल्यांचा वापर केला जात आहे. शीतपेयांच्या खाली बाटल्यांमध्ये देशी विदेशी दारू भरून ठराविक ठिकाणी ठेवण्यात येत असून त्यठिकाणी नियमित येणार्या ग्राहकांना जास्त दराने विक्री करून ग्राहकांची लुट केली जात आहे. याठिकाणी नवीन ग्राहकांना दारू विकायची नाही अशी सक्त सूचना विक्रेत्यांकडून तेथील कामगारास देण्यात आली आहे. तसेच शहरातील काही ठिकाणी सोडा विक्रीच्या माध्यमातून दारू विक्री केली जात आहे. पाण्याच्या खाली बाटल्या, शीतपेयांच्या खाली बाटल्या जमा करून त्या अवैध दारू विक्रेत्यांना विकण्याचा नवीन रोजगार काही जणांनी सुरु केला आहे. अनेक देशी विदेशी मद्याचा रंग पाणी व शितपेयांसारखा असल्यामुळे बाटलीमध्ये दारू आहे की शीतपेय आहे याचा अंदाज येवू शकत नसल्यामुळे बेकायदा दारू विक्रेत्यांना याचा चांगलाच फायदा होत असून दररोज हजारो रुपयांची कमाई केली जात आहे. अवैध दारू विक्रेत्यांना रोखण्याचे नवीन आव्हान पोलीस व दारू बंदी खात्याच्या अधिकार्यांसमोर उभे राहिले आहे.