शुक्रवारी होणार १०० कैद्यांची सुटका

0

मुंबई- महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त राज्यातील १०० कैद्यांची सुटका केली जाणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातली माहिती देतांना या सगळ्या कैद्यांची सुटका ५ ऑक्टोबरला केली जाणार असल्याचे सांगितले. नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगातून सर्वाधिक कैद्यांची सुटका केली जाणार आहे. राज्यातील एकूण नऊ मध्यवर्ती कारागृहांमधील तुरुंगातून या सगळ्या कैद्यांची सुटका केली जाणार आहे. एकूण ११ कारागृहांमधून १०० कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

तळोजा कारागृहातून ३७ कैदी, येरवडा कारागृहातून २४ कैदी, नाशिक कारागृहातून १० कैदी आणि इतर कारागृहातील प्रत्येकी एक-दोन कैद्यांना सुटकेमुळे दिलासा मिळणार आहे. ज्या कैद्यांवर गंभीर गुन्हे दाखल नाहीत, ज्या कैद्यांचे वय ५५ पेक्षा जास्त जास्त आहे. ज्या कैद्यांचे वय ५५ पेक्षा कमी आहे आणि ६६ टक्के शिक्षा पूर्ण झाली आहे. महिला आणि जे अपंग आहेत अशा कैद्यांची ५० टक्के शिक्षा पूर्ण झाली असेल अशाच कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

ज्या कैद्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्या कैद्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्या कैद्यांची सुटका होणार नाही. टाडा, मनी लॉन्ड्रिंग, ब्लॅक मनी, भ्रष्टाचार या प्रकरणांमधील कैद्यांचीही सुटका होणार नाही.