नवापूर (हेमंत पाटील)। शहरातील नागरिकांना अशुद्ध व क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने मुतखडा,कावीळ,अतिसार असे अनेक रोगाची लागण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काहीना आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मागील दोन वर्षांपासुन जलशुध्दीकरण प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित असुन सुद्धा हस्तांतरित का होत नाही असा सवाल केला जात असून झालेल्या कामाचे ऑडीट होवे तसेच ठेकेदाराने उशिरा झालेल्या कामाचे जाब द्यावा अशी मागणी केली जात आहे. 75 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून नगरपालिकेने कोट्यावधीचा प्रकल्प ताब्यात घेऊन जनतेच्या सदुपयोगात आणावा अशी नवापूरकरांची मागणी आहे.शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्प 10 वर्षानंतर पुर्ण झाला आहे. माञ नगर पालिका जीवन प्राधिकरणाकडून हस्तांतरित करून घेत नसल्याने जलशुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्यास पालिकेतील लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचे चित्र आहे.24 ऑक्टोबर 2005 रोजी नवापूर येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली. शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रकल्पाची जबाबदारी सोपविली होती.जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी 50 टक्के शासकीय अनुदान, 40 टक्के शासकीय कर्ज व 10 टक्के लोकवर्गणीतून कारायचा होता. यासाठी 1 कोटी 96 लक्ष 88 हजार रुपयांचा खर्चास मान्यता मिळाली होती.
जलशुध्दीकरण प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण
सध्या त्याच्याही आवाज निघत नाही.शुध्द पाणीपुरवठा कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जलशुध्दीकरण प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.उतावळा नवरा घुडघ्याला बाशिंग या उक्ती प्रमाणे माजी नगराध्यक्षा यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करून पाणीपुरवठाची चाचणीही करण्यात आली; परंतू जलशुध्दीकरण प्रकल्पाला आजही मुहूर्त सापडत नसल्याने नवापूरची 45 हजार जनता शुद्धपाण्याची प्रतिक्षा करीत आहेत. नगर पालिका प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक हे नागरिकांना शुद्ध पाणी देण्यास यशस्वी होतात किंवा नाही हा येणार काळच सांगेल. काही महिन्यांनी नगर पालिका निवडणुक आहे. आचारसंहिता लागू होईल मग पुढे हा प्रकल्प सुरू होईल की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. आता तरी नावापुरकरांची शुध्द पाण्याची प्रतिक्षा संपेल का नाही हा प्रश्न आहे.
जलशुध्दीकरण प्रकल्पाची कामे अपूर्ण
प्रकल्प जवळील संरक्षण भिंतीचे बांधकाम व लाईट बसविणे, रस्ते तयार करणे, पाणी तपासणी प्रयोग अद्यावत करणे, कर्मचारी नियुक्त, नवीन पाणी उपसा पाइप टाकणे इत्यादी कामे बाकी राहिले आहे.यासाठी पाच लक्ष चा निधी देण्यात आला आहे. तरी काम होत नाही.या उर्वरित कामापेकी बहुतेक काम झाली आहे
18 महिन्यांचा कालावधी असता बांधकामाला तब्बल दहा वर्षे
50 लक्ष क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या बांधकामासाठी18 महिन्यांचा कालावधी दिलेला असताना या प्रकल्पाच्या बांधकामाला तब्बल दहा वर्षे लागली आहे.दहा वर्षांत पाच नगराध्यक्ष बदलून गेले. लोकवर्गणीची रक्कम वेळेवर न मिळाल्याने प्रकल्पाचे काम रखडतच गेले. ठेकेदाराने आतापर्यंत एक कोटी 96 लाखांचे काम केले आहे. पालिकेने पैसा नसताना टप्याटप्याने 19 लाख 82 हजारांची लोकवर्गणी भरली आहे.पुरेशा पाणीसाठा काही तांत्रिक अडचणींमुळे जलशुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला नाहीे. तर ठेकेदारांच्या मते अजूनही निधी येणे बाकी आहे. या दाव्या-प्रतिदाव्यांपेक्षा नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प बद्दल ओरडून-ओरडून नगर पालिकेतील विरोधकांचा देखील घसा कोरडा पडला आहे.
दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग
दूषित पाणी पिण्यामुळे शरीरामध्ये 80 टक्के रोग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यातून काविळ, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार व साथीचे रोग होतात. नगर पालिकेच्या आडमुठेपणाच्या धोरणाचा फाटका नवापूर मधील नागरिकांना बसत आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प पुर्ण होत नसल्याने पावसाळ्याच्या मोसमात नागरिकांना नदीमधील गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
आजाराची लागण झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या
दूषित पाण्यापासून सुटका करून घेण्यासाठी प्रामुख्याने बोअर, विहिरीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. जेणेकरून पाण्यातील जीवाणू मरून जातात. त्याचसोबत पाणी पिण्याअगोदर ते पाणी गाळून घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. त्यामुळे काविळ, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार व साथीचे रोगास रोख लागू शकतो, नवापूर परिसरातील जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने काहीअंशी भाजीपाला मार्फत शरीरात क्षार वाढू शकते. तसेच क्षारांचे सर्वाधिक प्रमाण पाण्यातून मिळते.
– डॉ. अविनाश मावची ,
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय नवापूर.
गरिबांना शुद्ध पाणी पालिका केव्हा देणार
नवापूर शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने सर्वाधिक परिणाम गरिबांना होत आहे .सर्वसाधारण नागरिक आर्थिक भुर्दंड सहन करत करून घरात शुद्ध पाण्यासाठी आर.ओ सिस्टम बसवतात परंतू मजुर, हमाल, कामगार यांना दररोजच्या उदरनिर्वाह साठी भटकंती करावी लागत यांच्या साठी शुद्ध पाणी कोण उपलब्ध करून देणार या सर्वसाधारण जनतेचा विचार पालिकेने करावा तात्काळ जलशुध्दीकरण प्रकल्प सुरू करून कार्यान्वित करावा अन्यथा जनहितासाठी आंदोलन केले जाईल.
– हसमुख पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, नवापूर
प्रकल्पात जुन्या मशिनरीज बसवल्या
जलशुध्दीकरण प्रकल्पात जुनी मशिनरीज टाकण्यात आली आहे.जुन्या सहित्याला कलर लावून मशिनरीज बसविण्याचे कारस्थान संबंधित विभागाने केले आहे.भाजपाचे नगरसेवक पालिकेत असताना याविषयी अनेक वेळा आवाज उठवला परंतू कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस ने जाणूनबुजून जलशुध्दीकरण प्रकल्प कडे दुर्लक्ष केल्याने जलशुध्दीकरण प्रकल्प रखडला आहे.
– एजाज शेख, भाजपा माजी तालुकाध्यक्ष, नवापूर.
नवीन पाइपलाइनची आवश्यकता
ग्रामपंचायत काळातील जुनी पाइप लाइन बदलण्याची गरज आहे. नवापूरच्या जनतेला ख-या अर्थाने शुद्ध पाणीपुरवठा करावयाचा असेल तर नवीन पाईप लाईन टाकणे गरजेचे आहे. तेव्हाच शुद्ध पाणी नागरिकांना मिळले.जनहितासाठी पाइपलाइन साठी निधीची मागणी पालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. याकामी माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांनी लाखो रुपयांची निधी उपलब्ध करून दिली होती.
– दामू (अण्णा) बि-हाडे, माजी नगराध्यक्ष कॉग्रेस, नवापूर.