जळगाव । श्रावणातल्या गणवेशासाठी आई व पाल्याचे जॉईंट खाते उघडवायचे असून, पालकांकडून ते उघडले जात नसल्याची स्थिती आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे सदर प्रकाराची माहिती दिली असताना, जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकार्यांना सर्व विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलन्सने उघडून देण्याबाबत आदेश दिले असल्याचे उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.देवांग यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जातो. यंदापासून गणवेश न देता निधी देण्यात येणार आहे. याकरीता विद्यार्थी व आई यांचे जॉईंट खाते उघडायचे असून अद्याप 22 हजार विद्यार्थ्यांचेच बँकेत खाते उघडण्यात आले आहेत. तर यापैकी काही विद्यार्थ्यांनीच गणवेश घेतले आहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आजही विदावूट गणवेश आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप केले जात होते.
पावती दिल्यावर पैस
विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर कापड खरेदी, विद्यार्थ्यांचे माप घेऊन त्यानुसार कपडे शिवून घेण्याचे काम केले जात होते. परंतु यात बर्याचदा फसवणूक आणि गणवेश उशिराने मिळत असत. हे प्रकार थांबविण्यासाठी यंदा थेट बँक खात्यात रक्कम जमा करून पालकांनीच गणवेश खरेदी करून, त्याची पावती मुख्याध्यापकांकडे जमा करावयाची असून, यानंतर खात्यात निधी वर्ग करण्यात येणार आहे.
खाते उघडण्यात अनास्था
विद्यार्थ्यांनी गणवेश घेतल्यानंतर त्याची पावती शाळेत जमा केल्यानंतरच सदर रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. याकरीता राष्ट्रीयकृत बँकेत आई व पाल्यांचे जॉइंट खाते उघडावयाचे आहे. मात्र याबाबतच अनास्था असून, दोन महिन्यात एक तृतांशहून कमी म्हणजे जिल्ह्यात केवळ 22 हजार विद्यार्थ्यांचीच खाते उघडण्यात आली आहेत.
दोन गणवेशाची रक्कम
जिल्ह्यातील एक हजार 891 जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांमधील 1 लाख 59 हजार 611 विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन गणवेषासाठी प्रति विद्यार्थी चारशे रूपयांप्रमाणे 6 कोटी 38 लाख 44 हजार 400 रुपये इतका निधी शाळांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आला आहे. यापैकी दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांनीच गणवेश घेतलेले आहेत.