धुळे । महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला मिळावा यासाठी योजनेची माहिती जनतेपर्यत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव जी. एन. शिंपी, जिल्हा परीविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, अशासकीय सदस्य प्रा.डॉ.उषा साळुंखे, शोभा जाधव, दीना चौक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणासाठी योजना
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत पात्र महिलांना लाभ मिळवून द्यावेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने प्रचार व प्रसिध्दीवर भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी हुंडा पध्दतीच्या विरोधात जनजागृती व सहाय्य, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, महिलांसाठी वैयक्तिक व सामूहिक तसेच निवासी कार्यरत असणार्या जिल्हास्तरावरील सर्व विभागांच्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, महिला सक्षमीकरण, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, महिला बचत गट आदींचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.शिंपी यांनी विविध योजनांच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.