शुभम उतेकरला वीर अभिमन्यू, कोमल दारवटकरला जानकी पुरस्कार

0

मणिपूर । येथे संपन्न झालेल्या 37 व्या ज्युनियर गट (कुमार व मुली 18 वर्षाखालील) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपदावर नाव कोरले. ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुमार गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूस दिला जाणारा मानाचा वीर अभिमन्यू पुरस्कार महाराष्ट्राच्या शुभम उतेकरने तर मुलींमध्ये जानकी पुरस्कार महाराष्ट्राच्या कोमल दारवटकरने पटकावला. महाराष्ट्राच्या कुमार संघाचे हे सलग 13 वे तर मुलींचे सलग चौथे विजेतेपद आहे.

कोमलचे दमदार संरक्षण
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या बलाढ्य संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी कर्नाटकला (8-2,0-2) 8-4 असे 1 डाव व 4 गुणांनी चारीमुंड्या चीत करून अजिंक्यपद मिळवित आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. महाराष्ट्राच्या विजयात कोमल दारवटकर (4.20 मि व 3.10 मि नाबाद), रेश्मा राठोड (2 मि, 2.40 मि व 2 गडी), अपेक्षा सुतार (2.40 मि नाबाद) व प्रियांका इंगळे (3.10 मि व 1 गडी) यांचा महत्त्वाचा वाटा होता.

शुभमचा अष्टपैलू खेळ
मुलांच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरकरांचे कडवे आव्हान (11-11,13-8) 24-19 असे 5 गुणांनी मोडून काढत विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यंतरापर्यंत कोल्हापूरकरांनी छान लढत दिली. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात त्यांचे आव्हान फिके पडले. सामन्याच्या दुसर्‍या डावातील आक्रमणात महाराष्ट्राने कोल्हापूरचे 13 गडी टिपून सामना आपल्या बाजूने झुकवला.

महाराष्ट्राच्या शुभम उतेकरने दुसर्‍या डावात 2 मि संरक्षण करून संपूर्ण सामन्यात संघासाठी 7 गुणांची कमाई केली. तर वृषभ वाघने दुसर्‍या डावात 2.20 मि. संरक्षण केले. निहार दुबळेने 1.50 मि. संरक्षण करून 4 गडी बाद केले, संदेश जाधव ने 5 गडी बाद करून आक्रमणात चुणूक दाखवली. कोल्हापूरच्या अविनाश देसाई व अभिनंदन पाटील यांनी प्रत्येकी 5 गडी टिपले.