शुल्कवाढीविरोधात ‘अभाविप’ची पोलिसांकडे तक्रार

0

वाकड : येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाच्या संचालक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्ये अवाजवी वाढ केली आहे. ही वाढ पुणे विद्यापीठाच्या नियमांना धरून नाही. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक आहे, अशी तक्रार अभाविप संघटनेने केली आहे. यासंदर्भात वाकड पोलिसांना अभाविपने निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्राचार्यांकडून अरेरावी
अभाविपने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पुणे विद्यापीठाने प्रवेश शुल्क, त्यामध्ये करण्यात येणारी वाढ, याबाबत नियम घालून दिलेले आहेत. मात्र, असे असतानाही अचानकपणे प्रवेश शुल्कात 2 ते 3 हजारांनी वाढ करण्यात आली. याविषयी विद्यापीठाकडे निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये प्रवेश वाढीच्या पावत्याही जोडल्या होत्या. मात्र, ज्यांच्या पावत्या जोडल्या होत्या; त्यांना प्राचार्यांनी कार्यालयात बोलावून अर्वाच्य भाषेत बोलून तक्रार मागे घ्या, अन्यथा महाविद्यालयातून काढून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी कार्यालयाचे सीसीटीव्हीही तपासावेत. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, संस्थाचालक यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.