मुंबई । केंद्र शासनाने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमाल पातळीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळणार असून त्याचा सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना फायदा होईल. यासंदर्भात केंद्र शासनाकडे सातत्याने मागणी केली होती, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज दिली.
यासंदर्भात माहिती देताना पाशा पटेल म्हणाले, एप्रिल महिन्यात बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. परंतु तांत्रिक कारणांनी हा भाव कोसळला. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पाशा पटेल यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल व केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू तसेच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंहांच्या भेटी घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. या सर्व बाबी केंद्र सरकारच्या सचिव गटासमोर सादर करण्याच्या सूचना त्यांना संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या. नुकत्याच झालेल्या केंद्रीय सचिव गटाच्या बैठकीत हा विषय सादर करण्यात आला.
गेल्या दहा महिन्यांत चौथ्यांदा वाढ
त्यानंतर केंद्र सरकारने 14 जुन 2018 रोजी पाशा पटेल यांनी सुचवलेल्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार खाद्यतेलावर आयातशुल्क कमाल पातळीपर्यंत अर्थात 45 टक्के एवढे वाढवण्यात आले आहे. गेल्या दहा महिन्यांत चौथ्यांदा केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केली आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. चांगला भाव मिळणार असल्याने सोयाबीनचा पेरा वाढणार आहे, असेही पटेल यांनी सांगितले.