ठाणे । अंबरनाथ शहर ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटींग रेंज हे अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. अंबरनाथमधील विम्को नाका येथील पडीक जागेवर ठाणे जिल्ह्यातील पहिले जागतिक दर्जाचे शूटींग रेंज उभारण्यात येत असून त्याचे भूमीपूजन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पाडले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनिषाताई वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार उपस्थित होते.
पालिकेच्या आराखड्याला मंजुरी
अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शूटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंजचे 1998 पासून बंद अवस्थेत होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यासाठी सुचिता देसाई यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर पालिकेने सव्वा कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करीत या कामाला मंजुरी दिली. या शूटींग रेंजच्या जागेची स्वच्छता करुन त्या ठिकाणी नव्याने शूटींग रेंज सुरु करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांनी साधला अचूक निशाना
शूटींग रेंजच्या भूमीपुजनाच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हातात रायफल घेतली. समोरील अचूक निशाना साधत पालकमंत्र्यांनी देखील शूटींगचा अनुभव घेतला. पालककमंत्र्यांचा निशाना अचूक लागताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील हातात रायफल घेत अचूक निशाना साधत शूटींगचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, अब्दुल शेख, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ बालाजी किणीकर, प्रदिप पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.