भुसावळ : रेल्वेत शेंगा विक्री करून उदरनिर्वाह करणार्या विक्रेत्याचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अकोल्याच्या इसमाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन रमेश गायकवाड (रा.श्री लॉज, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, ते भुसावळ ते ईगतपुरी दरम्यान शेंगा विक्री करून उदरनिर्वाह करतात. 23 मे रोजी रात्री नऊ वाजता ते शहरातील श्री लॉजमध्ये मुक्कामा होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला मात्र काही वेळेतच तो गायब झाल्याने त्यांनी लॉजमालक व उतारकरू यांना विचारणा केली मात्र मोबाईल आढळला नाही. लॉज मालकाने संशयीत आरोपी अर्जुन बेलप्पा वाणी (एस.टी.चौक, हिंदू धर्मशाळा, रीलायन्स, अकोला) हा चेकआऊट न करता निघून गेल्याची माहिती दिल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला मात्र तो न झाल्याने संबंधितानेच मोबाईल चोरल्याची खात्री झाल्याने त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुषार केशव पाटील करीत आहेत.