शेंदुर्णीतील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मुख्याधिकार्यांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे नोटीसा : अनोळखीविरोधात गुन्हा
शेंदुर्णी, ता. जामनेर : नगरपंचायतीच्या लेटरपॅडचा गैरवापर करत मुख्याधिकार्यांची बनावट स्वाक्षरी करून माहिती अधिकार कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबाबत खोटी माहिती देणार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांना खोट्या नोटीसा
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या लेटर पॅड वापरून शेंदुर्णी येथील सहा माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या नावे खोट्या नोटीस बजावण्यात आल्या. त्यातील तीन व्यक्तींना नोटीस प्राप्त झाल्या तसेच नोटीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नियोजन समिती सदस्य संजय गरूड यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला होता. या विषयी संजय गरूड यांनी मुख्याधिकारी साजीद पिंजारी यांच्याकडे लेखी पत्र देऊन सदर नोटीसीबद्दल खुलासा मागितला होता. यात हा सर्व बनावट प्रकार असल्याचे उघड झाले.
अज्ञाताविरोधात गुन्हा
कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येथील नगरपंचायतीच्या लेटरपॅडचा गैरवापर करत मुख्याधिकार्यांची बनावट स्वाक्षरी करून माहिती अधिकार कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबाबत खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने नगरपंचायत कार्यालयाच्या मार्फत कार्यालय अधीक्षक सोनजे यांच्या फिर्यादवरून नगरपंचायतीचा लेटर पॅडचा गैरवापर व बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ उडाली असून यामागे कोण असावे ? याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले.