शेंदुर्णीत गाळे धारकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

0

शेंदुर्णी । येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने रेल्वेस्टेशन ते स्टेट बँकरोड पर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. सदर रुंदीकरण करतांनाच रस्त्यांचे मध्यापासून दोन्ही बाजूला 12 मीटर अंतरावर असलेल्या कच्च्या व पक्क्या बांधकामावर हातोडा चालविला जात आहे. दुर्दैवाने यात उत्तरभाग विविध कार्यकारी सहकारी संस्थेने आजचे 20 वर्षांपासून बांधून भाड्याने दिलेल्या 5 गाळ्या बरोबर संस्थेच्या कार्यालयाचे बांधकाम सुध्दा पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने नोटीस बजावली गेली आहे.

सूडबुद्धीने कारवाईचा आरोप
त्यामुळे संस्था हे गाळे व कार्यालय स्वतः हून पाडून जागा मोकळी करून देत आहे, परंतु संस्थेच्या वतीने अतिक्रमनात येणारे व न येणारे अश्या संस्थेच्या मालकीच्या सर्व गाळे धारकांना गाळे खाली करून देण्यासाठी नोटीसा बजावल्याने सर्वच गाळे धारकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सर्व गाळे धारकांनी 17 आणि 22 सप्टेंबर 17 रोजी संस्थेच्या संचालक मंडळास संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेल्या अन्याया विरोधात 29 सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. नवीन बांधकामासाठी संबंधित सहकार विभागाचे अधिकारी वर्गाकडून व इतर परवानग्या मिळवलेल्या आहे काय किंवा नुसते गाळे खाली करून घेण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित करून संस्था संचालक मंडळ मनमानी व सूडबुद्धीने हेतू पुरस्कर गाळे धारकांना मुद्दाम त्रास देण्यासाठीच ही कारवाई करत आहे, असा आरोप निवेदनात गाळेधारकांनी केला आहे.