शेंदुर्णी उद्यापासून पाच दिवस बंद :सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

0

शेंदुर्णी: येथे शनिवारी, 13 ते 17 जुनपर्यंत 5 दिवस कडकडीत बंद राहणार असल्याने परिसराच्या खेड्यातील लोकांनी शेंदुर्णी येथे नियमित खरेदीसाठी येऊ नये असे, आवाहन केले आहे. यासंदर्भात येथील नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.
बैठकीला मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, पंडितराव जोहरे, मनसेचे डॉ.विजयानंद कुलकर्णी, व्यापारी असो.चे अध्यक्ष तजय अग्रवाल, काजेश कोटेचा, गिरीश कुलकर्णी, मेडिकल असो.चे, भाजपचे नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी, अलीम तडवी, गणेश कोळी, राष्ट्रवादीचे धिरज जैन, रवींद्र गुजर, योगेश गुजर, गजानन धनगर, काँग्रेसचे फारूक खाटीक, शिवसेनेचे संजय सूर्यवंशी, डॉ.पंकज गुजर, संजय गायकवाड, विजय धुमाळ, शंकर बारी, श्रीकृष्ण चौधरी तर पत्रकार संघाचे विलास अहिरे, अ‍ॅड.देवेंद्र पारळकर, अतुल जहागीरदार, अशोक जैन, दीपक जाधव, दिग्विजय सूर्यवंशी, संतोष चौधरी उपस्थित होते.

दक्षता घेणे गरजेचे
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसे या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी असो.चे प्रतिनिधी, पत्रकार व नागरिक यांच्यात गुरुवारी, 11 जुन रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमण विषयावर विचार विनिमय होऊन चिंता व्यक्त करण्यात आली. शेंदुर्णीपासून आठ, दहा किलोमीटर अंतरावर दोंदवाड़ा, नाचणखेडा, पहुर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर नाचणखेडा आणि जामनेर येथील काही रुग्णाला कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असतांना शेंदुर्णी नगरपंचायतीच्या हद्दीत नागरिकांच्या व नगरपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग प्रशासनाच्या सहकार्र्‍याने कोरोना थोपवण्यात जरी यश आले असले तरी सध्याचा काळ हा कोरोना समूह संक्रमण काळ असल्याने अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. ते सर्वांच्या लक्षात आल्याने बैठकीत 13 ते 17 जुनपर्यंत पाच दिवस अत्यावश्यक मेडिकल, दवाखाने, दूध व कृषी केंद्र या सेवा वगळता इतर सर्व दुकाने आस्थापने कडकडीत बंद पाळतील.

दर बुधवारी  बंद
त्यानंतर 18 ते 30 जुन या काळात परवानगी देण्यात आलेली दुकाने आस्थापना दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 या काळातच सुरू राहतील. दुपारी 3 नंतर सर्व दुकाने बंद करणे बंधनकारक राहील, असे एकमताने ठरले आहे. तसेच या व्यतिरिक्त दर बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात येईल, असेही ठरले. अशा आशयाचे निवेदन सर्वपक्षीय प्रतिनिधी, व्यापारी संघटना, पत्रकार नागरिकांच्यावतीने शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उप पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना देण्यात आले.