शेंदुर्णी । येथील बारी गल्लीतील इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत तारांचा शॉक लागून मंगळावर 22 मे 17 एक माकड बेशुद्धावस्थेत जमिनीवर कोसळले होते तेव्हा ते मेले असावे, म्हणून पाहण्यासाठी गेलेल्या राहुल बारी, नाना धांडे, गजानन बडगुजर, रुपेश बारी, योगेश गुजर, अभिषेक बारी, कृष्णा बारी, या युवकांना सदर माकड बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यांनी गल्लीतच दवाखाना असलेल्या डॉ. युवराज बारी यांना बोलावून त्यांना सदरचे माकड दाखविले. त्यांनी सदर माकड आपल्या दवाखान्यात आणून त्यास इंजेक्शन देऊन त्याची सुश्रुषा केली व त्याला शुद्धीवर आणले नंतर इतर माकडांमध्ये नेऊन सोडून दिले.
मानवीय भावनेतून इलाज
या आधीही डॉ.युवराज बारी यांनी चार माकड व दोन मांजरीवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. डॉ. युवराज बारी हे लकवा (अर्धांगवायू) च्या इलाजासाठी परिसरात प्रसिध्द असून तालुक्यातील होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड झाली आहे, त्यांचा मनात मुक्या प्राण्यांविषयी असलेल्या दया भावनेतून ते मुक्या प्राण्यांवर मानवीय भावनेतून इलाज करून जीवदान देण्यासाठी धडपडत असतात. सद्या शेंदूर्णी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असतांना डॉ.बारी आपल्या शेतात मान्सून पूर्व कपाशीचे लागवडीसाठी पुरेसे पाणी शेतातील बोरिंगला उपलब्ध असतांना कपाशी लागवडी ऐवजी गावातील पाणी टंचाईची जाण ठेवून उपलब्ध पाण्याचा गावातील नागरिकांना दररोज मोफत 8/10 टँकर पाणी पुरवठा करीत आहे.