शेंदूर्णीत मोकाट गुरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त

0

शेंदूर्णी – येथे २९ मार्च २०१८ पासून नगरपंचायत अस्तित्वात आली आहे तेव्हा पासून नगरपंचायत प्रशासक म्हणून तहसीलदार नामदेवराव टिळेकर, व मुख्याधिकारी म्हणून जामनेर नगरपालिका मुख्याधिकारी राहूल पाटील कारभार पाहत आहेत. गावातील अरुंद रस्ते व बाजार पेठेतील दुकानांपुढे लावून ठेवलेल्या मोटार सायकलीमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असतानाच गेल्या महिन्याभरापासून मोकाट गुरे रस्त्यावर सोडली जात आहे.

ही गुरे रस्त्यावर कुठेही कळपाने बसतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अग्रसेन चौक, महावीर मार्ग, गांधी चौक, पारस पतसंस्था चौक, पहुर दरवाजा, बस स्थानक या वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा वावर दिसून येतो.

अनेक वेळा वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहन धारकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसान वादात होते अश्या वेळी पोलिसांना कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दमछाक करावी लागते. नगरपंचायत प्रशासक व प्रशासन अधिकारी यांनी मोकाट गुरे मालकांवर कारवाई करावी किंवा गुरे गो-शाळेत तरी जमा करावी अशी मागणी नागरिक व वापाऱ्यांकडून होत आहे.