शेंदूर्णी नगरपंचायतीबाबत प्रथम अधिसूचना प्राप्त

0

शेंदूर्णी । जामनेर तालुक्यातील सद्यस्थितीत सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली शेंदूर्णी ही नगरपंचायत व्हावी यासाठी शेंदूर्णी येथील राजकीय मंडळींकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. दरम्यान शेंदूर्णी नगरपंचायत व्हावी यासाठी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य गोविंद अग्रवाल हे गेल्या चार दिवसापासून मंत्रालयात ठाण मांडून बसले आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे दिसते. त्यांच्याशी दैनिक जनशक्तिच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रथम अधिसूचना प्राप्त झाल्याचे सांगितले. 2011 च्या जनगणनेच्या आधारावर शेंदुर्णी नगरपंचायत जाहीर करण्यात आली असून प्रथम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

महिनाभरात मागविल्या हरकती
1 महिन्याच्या काळात हरकती मागविण्यात आल्या असून हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर रितसर नगरपंचायत स्थापना होईल परंतु विद्यमान ग्रामपंचायत कार्यकाल 22 मे पर्यंत असताना व कार्यकाल संपण्याच्या 40 दिवस आधी निवडणूक आयोगाने निवडणूक घेणे गरजेचे असते. दरम्यान ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 5 फेबु्रवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याअगोदर जर नगरपंचायतीची घोषणा झाली तर ग्रामपंचायत निवडणूक रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.