शेंदुर्णी । येथील अहिल्याबाई होळकर गल्ली व खळवाडी भागातील नागरिकांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवडा उलटून देखील पाणीपुरवठा होत नसल्यासने अखेर संतप्त महिलांनी नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. महिलांनी काढलेल्या मोर्चाने नगरपंचायत परिसर दणाणले होते. जलसंपदामंत्र्यांच्या मतदारसंघातील सर्वात मोठे गाव म्हणून शेंदूर्णीला ओळखले जाते, नुकतेच शेंदूर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले आहे. सध्या नगरपंचायतीचा कारभार तहसिलदार नामदेव टिळेकर हे प्रशासक म्हणून पाहत आहे.
वाढीव वस्त्या
शेंदुर्णी गांवाला गोंदेगाव व वेताळवाडी येथील धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आधी पाणीपुरवठ्याचे 45 भाग होते. वाढीव वस्त्यांमध्ये पुन्हा 53 भाग निर्माण झाले त्यामुळे 98 भागात पाणीपुरवठा होतो. आधी गोंदेगाव गणेशपूर व शेंदुर्णी गावासाठी पाणीसाठा राखीव केला जात होता परंतु गेले दोन वर्षांपासून लिहातांडा गावांची तहान सुद्धा याच धरणाच्या पाण्यावर भागविली जात आहे. कमी पावसाळा झाल्याने गोंदेगाव धरण जेमतेम 45 टक्के भरले होते त्यात आता केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यातून 15 दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो तर वेताळवाडी धरणात 50 टक्के साठा आहे.
आठवड्याभरानंतर पाणीपुरवठा
पाणी पुरवठा 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून होत असल्याने पाण्याची 3 लाख लीटर क्षमतेची टाकी दिवसातून दोन वेळा भरली जाते ज्यावर 12 भागात पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे कितीही नियोजन केले तरी आज गावातील प्रत्येक भागात आठवड्याभरानंतर पाणीपुरवठा केला जात होता. प्रशासकीय अधिकारी म्हणून जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर आहेत.
प्रशासक निवडणूकीत व्यस्त
जामनेर नगरपालिका निवडणूकित व्यस्त असल्याने प्रशासकांनी गावाची सूत्रे हातात घेतली नाही. पाणी टंचाईवर तोडगा काढण्यात यावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल यांनी महिलांच्या मोर्चाला सामोरे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तहसीलदार नामदेव टिळेकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गावातील पाणीटंचाई दुर करण्याबाबत पाठपुरावा केला आहे.