किन्हवली । शहापूर तालुक्यातील दहिवली वन परिमंडळाचे शेंद्रुण येथे बांधण्यात आलेल्या कार्यालयाचा वापर येथे शेजारीच असलेल्या आदिवासी वाडीतील रहिवासी शौचालय म्हणून करत आहेत. यामुळे कार्यालयात कार्यरत असलेल्या 5 वन कर्मचार्यांना दुर्गंधीमुळे काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे हल्ली कर्मचारी इथे ढुंकूनही बघत नसल्याचे चित्र आहे. शहापुर वन विभागाच्या दहिवली परिमंडळाचे शेंद्रुण येथे क्षेत्रीय कार्यालय असून या ठिकाणी 1 वनपाल 2 वनरक्षक तर 2 शिपाई, असे 5 कर्मचारी कार्यरत आहेत.
20 वर्षांपूर्वी बांधले होते सुसज्ज कार्यालय
शेंद्रुण, दहिवली, कळगाव,भागदळ, टेभंरे,बावघर, ठिले,चिंचवली,लेनाड बु. गोकुळगाव, आंबिवली आदी गाव पाडयांचा समावेश आहे. या राखीव वनक्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च करून शेंद्रुण गावात मध्यवर्ती ठिकाणी अंदाजे 20 वर्षापूर्वी सुसज्ज कार्यालय बांधले आहे. मात्र कार्यालय उभारणी नंतर काही वर्षांत त्याकडे वनविभागाच्या अधिकार्यांनी पाठ फिरवल्याने सदर कार्यालयाची कधीही डागडुजी करण्यात आली नाही. कार्यालय परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी, प्रत्येक पावसाळ्यात उगवणारे गवत व जंगली वनस्पती या मुळे हे कार्यालय दुर्लक्षित राहिले आहे.दरम्यान परिसरात राहणारे आदिवासी या कार्यालयाचा वापर चक्क शौचालय म्हणून करत असल्याने वन कर्मचारी या ठिकाणी ढुंकूनही बघत नसल्याचे शेंद्रुण ग्रामस्थांनी सांगितले.
आचारसंहिता असल्याने प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. जिल्हा नियोजनाच्या विकास आराखड्यात फंड उपलब्ध आहे. लवकरात लवकर कार्यालयाची दुरुस्ती करुन ते वापरण्यास योग्य होईल.
– एन.जी. कोकरे,
वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर
कार्यालयाची प्रचंड दुरवस्था झाली असून ते बसण्यायोग्य नाही. जिथे जागा मिळेल तिथे थांबून कार्यालयीन कामकाज पूर्ण करावे लागते.
– अंकुश धनगर,
वनपाल दहिवली परिक्षेत्र