काही मिनिटांतच 5 लाख कोटी रुपये बुडाले
मुंबई । जगभरातील शेअर बाजारांसाठी मंगळवारचा दिवस काळा ठरला. निर्देशांक कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे काही मिनिटांतच 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत, असा अंदाज आहे. आजपर्यंत एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड मानली जाते. भारतीय शेअरबाजार तर कोसळलाच, जपानचा निक्केई हा निर्देशांकदेखील 4.6 टक्क्यांनी कोसळला होता. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसांमधल्या सरासरीखाली या तिनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले होते.
2011 नंतरची सर्वाधिक मोठी घसरण
सोमवारी अमेरिकच्या डाऊ इंडस्ट्रियल या निर्देशांकाने 1600 अंकांची अभूतपूर्व घसरण अनुभवली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे. सरकारी कर्जरोख्यांमधून मिळणारे वाढीव उत्पन्न व महागाई वाढण्याची भीती या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. अमेरिकी शेअर बाजारातील स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर 4.1 टक्क्यांनी घसरला तर डाऊची घसरण 4.6 टक्क्यांची झाली. ऑगस्ट 2011 नंतरची ही सर्वाधिक मोठी घसरण ठरली आहे.
महागाई आणि व्याजदर वाढणार
अमेरिकी कर्जरोख्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली भरघोस वाढ या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. अमेरिकी कर्मचार्यांचे पगार अत्यंत वेगाने वाढत असून, 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याजदरही वाढतील असा अंदाज आहे. परिणामी, शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला.