शेअर बाजारातही लाट

0

मुंबई । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साहाची लाट पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशसह भाजपला अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे सरकारची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत होणार असून त्यामुळे सुधारणांच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) प्रमुख क्षेत्रांचे निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी वधारले आहेत.

भारतीय विरोधकांनी हार स्वीकारली
पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकींच्या निकाला दरम्यान जनमताचा कौल भाजपच्या बाजूने झुकतोय, असे लक्षात आल्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये ओमर अब्दुल्ला म्हणाले की, युपीत भारतीय जनता पक्षाची त्सुनामी दिसत आहे. त्याला छोट्या मोठ्या तलावातील लाट समजू नका. विरोधी पक्षांनी 2019 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुका विसरून जाव्यात, त्यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीची तयारी करावी. या ट्विटमध्ये अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करू शकेल असा नेता देशात पाहण्यात नाही, याशिवाय भाजपला आव्हान देईल असा पक्षही देशात नाही. विरोधी पक्षांनी भाजपच्या विजयाबद्दल टिका न करता, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या पक्षाची रणनिती बदलावी. उत्तर प्रदेशचा निकाल वगळता इतर राज्यांच्या निकालांनी भाजप अपराजीत नाही हे दाखवलेले आहे.