निराशाजनक बजेटचा फटका : सेन्सेक्स 839 प्वाइंट, निफ्टी 256 प्वाइंटने घसरले
नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेअर्सवर दहा टक्के कर लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचा जबरदस्त फटका शेअर बाजाराला बसला आहे. शुक्रवारी शेअर बाजार चांगलाच गडगडला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 884 अंकाची घसरण नोंदवण्यात आली तर निफ्टीमध्येही 266 प्वाइंटची घसरण झाली होती. गडगडत गेलेला सेन्सेक्स अखेर 839 अंकावर व निफ्टी 256 अंकावर घसरून बंद झाले. या घसरणीमुळे बीएसईचे मार्केट कॅप 4.70 लाख कोटींनी घसरून 148.20 लाख कोटी झाले आहे. एकूण अडिच हजार शेअरमध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. बजेटच्या दुसर्याच दिवशी तब्बल 4.70 लाख कोटींचा चुना लागल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहे. या शिवाय, सिंगापूर व आशियातील अन्य शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण, याचा एकत्रित परिणाम शुक्रवारी मुंबई शेअर बाजारावर दिसून आला.
या कारणामुळे शेअर बाजार गडगडला
– बजेटमध्ये दीर्घकालीन मुदतीच्या शेअरवर 10 टक्के कर
– सरकारने वित्तीय तुटीचे लक्ष्य 3.2 टक्क्यांवरून 3.5 टक्के केले आहे
– केंद्राच्या राजकोषीय तुटीवर मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त होत आहे
– शेतकर्यांना खरिपासाठी जादा किंमत दिल्यास महागाई वाढणार, त्यामुळे आरबीआय व्याजदरात कपात करणार नाही
– बजेटमधील काही तरतुदीबाबत सरकारने समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही
सेन्सेक्सच्या या शेअरमध्ये झाली घसरण
शेअर घसरण
बजाज ऑटो 4.90 टक्के
भारतीय एअरटेल 4.62 टक्के
एक्सिस बँक 4.28 टक्के
मारुती 4.28 टक्के
रिलायन्स 4.07 टक्के
गुंतवणूकदार, उद्योगजगत हवालदिल
केंद्र सरकारने लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सला पुन्हा एकदा लागू केले आहे. त्याअंतर्गत एक वर्षापेक्षाअधिक कालावधीसाठी व एक लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर 10 टक्के कर लावला जाणार आहे. या करामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर कमी लाभ मिळणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक काढून घेत असून, ती अल्पमुदतीची करत आहेत. या करामुळेच गुरुवारीदेखील शेअर बाजारात घसरण झाली होती. केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयावर अनेक गुंतवणूकदारांसह उद्योगजगतानेदेखील तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दलालांनीही हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारा ठरेल, अशी भीती व्यक्त केली. तर काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अशा प्रकारची घसरण आणखी काही दिवस राहील. नवीन करामुळे शेअरधारकांना अधिक कर भरावा लागणार असून, 2017-18चा राजकोषीत तोटा पाहाता त्याचा जीडीपीवरदेखील परिणाम होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनिश्चित आर्थिक स्थिती निर्माण झाल्याने गुंतवणूकदार शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याचा पर्याय निवडतील, अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बँकांचे शेअर घसरले
अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा आदींच्या शेअरच्या दरात घसरण झाली. रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात पतधोरण जाहीर करणार आहे. तसेच बजेटमधील घोषणांबाबत काहीसा संभ्रम असल्याने शेअर बाजारात घसरण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला.