जळगाव। डॉेक्टरांवरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांच्या नातेवाईक व असामाजिक लोकांकडून डॉक्टर व रूग्णालयांवर होणारे हल्ले वाढत असल्याने हे हल्ले थांबले पाहिजे, डॉक्टरांना खाजगी सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा पुरवावी, रूग्णासोबत दोन नातेवाईकांना परवानगी द्यावी, तसेच सुरक्षेविषयी डागा समितीने सुचविलेल्या शिफारसी शासनाने मंजूर करून त्या तत्वत: लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी डॉक्टर, केमिस्ट असोसिएशन, आयएमए या संघटनांसह वैद्यकीय प्रतिनिधींनी शुक्रवार 24 रोजी मोर्चा काढला. जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर्सने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. जिल्ह्यात नव्यानेच आलेले जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मागण्या राज्य सरकारमार्फत मान्य होत नसल्यामुळे त्याच्या निषेधार्थ व सरकार दरबारी आपली भूमिका पोहोचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्ह्याभरातील डॉक्टरांचा समावेश होता डॉक्टरांनी काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध केला.
300 खाजगी रुग्णालये बंद रुग्णांचे हाल
खान्देशातील मेडीकल हब समजल्या जाणार्या जळगाव शहरातील सुमारे 300 खाजगी रुग्णालयांची ओपीडी संपामुळे बंद ठेवण्यात आले. केमिस्ट संघटनेनेही पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील 2500 वैद्यकीय दुकानदारांनी गुरुवारी 23 रोजी कडकडीत बंद पाळला. उन्हांचे चटके लागायला सुरुवात झाल्याने व डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. खाजगी रुग्णालये बंद असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील गर्दी वाढली.
मोर्चाचे नेतृत्व
जिल्ह्यातील डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. डॉक्टरांच्या गेल्या अनेक दिवसांपासुन विविध मागणी सुरु आहे. शासनाने ठोस निर्णय न दिल्याने बंद पुकारण्यात आला आहे. राज्यभर हा संपपुकारण्यात आला आहे. शहरात काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व आयएमएचे अध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ.प्रताप जाधव, डॉ.शशिकांत गाजरे, डॉ. राधेश्याम चौधरी आदींनी केले. डॉक्टर्स, खाजगी रुग्णालये, मेडीकल दुकान, पॅथॉलाजी लॅब,सोनोग्राफी सेंटर्सच्या प्रतिनिधींनी या मोर्चात सहभाग नोंदविला.
यांचा होता सहभाग
महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, युवाशक्ती फाऊंडेशन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी मोर्चात सहभाग घेतला. मोर्चात मुख्यतः आयएमए चे अध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, डॉ.अनिल पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, अभय चौधरी, मयुर जैन, अमोल कुलकर्णी, शेखर सोनाळकर, गनी मेमन, विराज कावडीया, अमित जगताप आदींसह गोदावरी मेडीकल कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.