शेकडो मद्यपींना पोलिसांनी पाठवले परत

0

पनवेल : पाऊस जोरात पडत असल्याने अनेक पर्यटक पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरणाकडे आगेकूच करत आहेत. यात काही मद्यपींचा देखील समावेश असतो. अशा मद्यपींना तालुका पोलीस धरणाकडे जाऊन देत नसल्याने पुढील धोका टाळत आहे. वाजे गावाजवळ चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे. येणारी प्रत्येक गाडी चेक करूनच पुढे सोडली जात आहे. मात्र वाजे गावाजवळ बेरीगेड्स लावून बसलेले पोलीस गाड्या तपासूनच पुढे पाठवत आहेत. मद्यपीना धरणाच्या परिसरात देखील फिरकू दिले जात नाही.

पनवेल तालुक्यातील गाढेश्वर(देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात मजा लुटण्यासाठी हजारो पर्यटकांच्या झुंडी येत असतात. अति उत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आपल्या जीवाला मुकतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय पोलिसांची फिरती गाडी देखील तैनात करण्यात आलेली आहे. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक गाढेश्वर (देहरंग) धरणाच्या दिशेने ये जा करत असतात. यातील काही जण पोलिसांना चकवा देत निघून जातात तर काही पर्यटक दुसर्‍या रस्त्याने धरणाच्या दिशेने जातात मात्र धरणाकडे गेटला कुलूप लावलेले असल्याने कुणालाही आत जाता येत नाही. त्यामुळे पर्यटक गाढी नदीच्या पाण्यातच डुबक्या मारत आनंद घेतात. तरुण मुलांना धरणाच्या दिशेने जाऊन देत नसल्याने तरुण मंडळी एस टी मध्ये बसून धोदानी गावाकडे निघून जातात.

दोघांचा बुडून झाला होता मृत्यू
मागील दहा पंधरा दिवसापूर्वी धरणाच्या परिसरात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरात पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन केले जात आहे. गेल्या आठवड्यापासून पाऊस धो धो कोसळत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये व स्वताचा जीव धोक्यात घालू नये असा संदेश पोलिसांकडून देण्यात येत आहे.