करसंकलन विभागाच्या अधिकार्यांकडून शास्तीकरात सावळा गोंधळ
मिळकतीच्या नोंदीमध्ये तफावत; कारवाईची मागणी
पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचा-यांनी शास्तीकराचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. शास्तीकर लागू होत असताना अनेक बांधकामांना शास्तीकरापासून सूट दिल्याचे समोर आले. हे करून नागरिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप चिंचवडमधील काही नागरिकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केला आहे. तसेच, या प्रकरणी संबधितांच्या वरिष्ठ अधिका-यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. चिंचवडमधील इंदिरानगर भागातील विनायक गायकवाड यांच्यासह काही नागरिकांनी हे प्रकरण निदर्शनास आणून दिले आहे.
अधिकार्यांचा फायदा
इंदिरानगरमधील 40 हून अधिक बांधकामांमध्ये करसंकलन विभागाकडून झालेल्या नोंदमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे एकसारख्या असलेल्या बांधकामांना वेगवेगळा मिळकत कर लागला आहे. एका बांधकामाला शास्तीकर लावला असून एका बांधकामाला शास्तीकरापासून मुक्ती दिली आहे. हे याच विभागातील कर्मचा-यांनी आर्थिक फायद्यासाठी घडवून आणल्याचा आरोप येथील नागरिकांनी आयुक्तांकडे केला आहे. यापूर्वी करसंकलन विभागाचे प्रमुख सहआयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे विचारणा केली होती. त्यांच्याकडून असे प्रकार नजर चुकीने झाल्याचे सांगण्यात आल्याचेही विनायक गायकवाड यांनी म्हटले.
कारवाईकडे लक्ष
नजरचुकीने असे गंभीर प्रकार पालिका प्रशासनात कसे होतात, हा प्रश्न आहे. मिळकतींना शास्तीकरापासून सवलत देण्याचे आणखी प्रकार घडले असून त्यातून शासनाची, पालिकेची फसवणूक झाली आहे. पालिकेचे आर्थिक नुकसानही झाल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, करसंकलन विभागाने घातलेला हा घोळ समोर आल्यानंतर या प्रकरणात तातडीने कर्मचा-यांना नोटिसा बजाविण्यात आल्या. या प्रकरणी गटलिपिक विशाल भोईर, दिपक सरोदे, उत्तम काळभोर या तिन कर्मचा-यांना करसंकलन विभागामार्फत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. मात्र, हा गंभीर प्रकार असल्याने यापुढे आणखी मिळकतींची चौकशी होणार का आणि दोषी कर्मचारी, अधिका-यांवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागुन आहे.