शेकापमधील ‘इनकमिंग’च्या निमित्ताने…

0

राजकीय परंपरेप्रमाणे विशेषतः राजकीय महत्त्वाकांक्षा असलेला नेता व त्याचा गट जो राजकीय पक्ष सत्तेत असतो वा सत्तेत येण्याची क्षमता ठेवतो अशाच पक्षात प्रवेश घेत असतात. शेकापची सद्यःस्थितीतील राजकीय क्षमता पाहता तो सत्तेत येणे वा सत्तेचा दावेदार बनणे हे दूरदुरूनही शक्य नाही. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडने स्वतःचे राजकीय व्यासपीठ तयार केलेले असताना त्यात सामील न होता प्रवीण गायकवाड शेकापचा राजकीय मार्ग चोखाळतात याचे सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे.

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात बलाढ्य काँग्रेस पक्षाला राजकीय आव्हान देण्याची क्षमता ठेवणारा शेतकरी कामगार पक्ष वर्तमानस्थितीत राज्याच्या राजकारणातून जवळजवळ बेदखल झालेल्या स्थितीत असताना ‘संभाजी ब्रिगेड’मधील प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे इत्यादी नेते आपल्या अनेक सहकार्‍यांसोबत शेकापमध्ये ‘इनकमिंग’ करतात, तेव्हा यामागची निश्‍चित भूमिका काय? हे तपासणे महत्त्वाचे ठरते.

राजकीय परंपरेप्रमाणे विशेषतः राजकीय महत्त्वाकांक्षा असलेला नेता व त्याचा गट जो राजकीय पक्ष सत्तेत असतो वा सत्तेत येण्याची क्षमता ठेवतो अशाच पक्षात प्रवेश घेत असतात. शेकापची सद्यःस्थितीतील राजकीय क्षमता पाहता तो सत्तेत येणे वा सत्तेचा दावेदार बनणे हे दूरदूरूनही शक्य नाही. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडने स्वतःचे राजकीय व्यासपीठ तयार केलेले असताना त्यात सामील न होता प्रवीण गायकवाड शेकापचा राजकीय मार्ग चोखाळतात याचे सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे.

राजकारण हा व्यवसाय झालेल्या काळात सत्ताधार्‍यांशी संगत सोडून सत्तेच्या परिघाबाहेर फेकलेल्या पक्षात प्रवेश करणे ही सोपी बाब नाही, असे धाडस तेच करू शकतात जे राजकीय सत्ताकारणापेक्षा विचारांच्या बांधिलकीला जास्त महत्त्व देतात. प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे व त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ब्राम्हणेत्तर वादाची चळवळ मोठ्या आक्रमतेने चालवत होते. हा त्यांच्या विचारांचा वारसा त्यांना शेकापमध्ये दिसल्याकारणाने ही मंडळी राजकारणाचा विचार पक्का झाल्यावर शेकापमध्ये प्रवेश करती झाली, असा निष्कर्ष काढता येतो. या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचा वैचारिक वारसा, 1950 च्या दशकातील राजकीय दबदबा आणि 1990 नंतर पक्षाचा खालावलेला आलेख समजून घेणे अगत्याचे ठरते. शेतकरी कामगार पक्षाची वैचारिक नाळ महात्मा फुले यांच्या विचारांशी जोडलेली होती. जातीव्यवस्था, स्त्रीदास्य व उच्चवर्णीयांचे सांस्कृतिक वर्चस्व याविरोधात जोतिबांनी उठाव केला होता. स्त्रीशुद्रातिशुद्र, शेतकरी व कामगार या सर्व शोषितांनी आत्मोद्धारासाठी संघटित व्हावे, असा विचार घेऊन महात्मा जोतिबांनी 1873 साली ‘सत्यशोधक’ समाज स्थापन केला. यातून प्रेरणा घेऊन ब्राह्मणेत्तर चळवळीला चालना मिळाली. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, गाडगीळ यांसारखी काही मंडळी राजकारणात बहुजन समाजाला न्याय मिळावा या हेतूने ‘ काँग्रेस पक्षात’ सामील झाले. त्याकाळात काँग्रेस ही चळवळ होती. त्यात अनेक विचारसरणींचा प्रवाह सामील होता. स्वातंत्र्य समोर दिसताच काँग्रेस भांडवलदार व शोषणकर्त्यांच्या प्रभावाखाली येत आहे, असे आरोप करत समाजवादी, कम्युनिस्ट बाहेर पडले.

याच कारणाचा आधार घेत काँग्रेस पक्षात गेलेल्या शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुलसीदास जाधव, नाना पाटील इत्यादींनी काँग्रेस पक्षात बहुजन समाजाची गळचेपी होतेय, शेतकरी-कामगार यांचे हित पाहिले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस पक्ष सोडला. वरील नेत्यांनी 1948 ला ‘शेतकरी कामगार पक्षाची’ स्थापना केली. या पक्षाला ब्राह्मणेतर चळवळीचा वारसा असल्याने अल्पावधीतच पक्षाचा राज्यभर विस्तार झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात शेकापची निर्मिती हे काँग्रेस पक्षाला आव्हान होते. शेतकरी व कामगार वर्ग हा काँग्रेस पक्षाचा मतदार शेकापने आपल्याकडे वळवल्याने काँग्रेस पक्षाने शेकापने आपल्याकडे वळवल्याने काँगे्रस पक्षाने शेकाप जातीयवादाचा पुरस्कर्ता असल्याचा आरोप केला. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शेकापने ब्राह्मणेतर विचारसरणीच्या आपल्या मूळ विचारांना बगल देत मार्क्सवाद लेनिनवादाचा पुरस्कार केला. त्यामुळे पुढच्या काळात पक्षाची वैचारिक कोंडी झाली. 1955 नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सीमा आंदोलन, कामगार शेतकर्‍यांची आंदोलने यातून शेकापमध्ये नवे नेतृत्व पुढे आले. काँग्रेस पक्षाच्या विरोधात सं. म. समितीत शेकाप सर्वात मोठा पक्ष होता. ग्रामीण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अनेक गड शेकापने पाडले. 1957 च्या द्विभाषिक राज्यातील निवडणुकांत राज्यातून 31 आमदार शेकापने निवडून आणले. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाणांनी, बहुजन समाजाची सत्ता असताना तुम्ही विरोधात का? असा प्रश्‍न करत शेकापचे संस्थापक असलेल्या मोरे, जेधे, जाधव यांना काँग्रेस पक्षात आणले आणि काँग्रेसला पर्यास ठरू पाहणार्‍या शेकापला दे धक्का दिला. या फुटीनंतर शेकाप पुन्हा उभाच राहू शकला नाही. नव्या नेत्यांनी पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. आंदोलने चालवली. आघाडीच्या राजकारणात सत्तास्पर्शही केला, पण त्याची भूमिका दुय्यम राहिली. ब्राह्मणेतर चळवळीचा वारसा सोडून स्वतःला डाव्या आघाडीत कोंबल्याने शेकाप स्वःतत्त्व हरवून बसला. शेकाप आज रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला असून, जयवंतराव पाटीलांकडे पक्षाची सर्व सूत्रे गेली आहेत. म्हणूनच एकेकाळी ब्राह्मणेतर चळवळीचा वारसा सांगणारा पक्ष या वैचारिक आकर्षणामुळे प्रवीण गायकवाड व त्यांचे सहकारी शेकापमध्ये गेलेत. आता शेकापला मूळ वैचारिक ओळख व राजकीय संजीवनी देण्याची जबाबदारी त्यांची!

– विजय य. सामंत
9819960303