पुणे । शहरातील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. यावेळी अभिनेते शेखर सुमन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आय.टी. तज्ज्ञ आनंद खांडेकर, क्रिकेटपटू केदार जाधव, यांना पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड देऊन गौरविले जाणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतीक, कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती माजी खासदार आणि महोत्सवाचे संयोजक सुरेश कलमाडी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश मडळांचा विशेष गौरव
राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उद्घाटनाला हजेरी लावणार आहेत. फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री हेमामालिनी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवास 125 वर्षे होत असल्याने कसबा गणपती मंडळ, केसरी गणेशोत्सव, भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
व्यंगचित्र प्रदर्शन
यंदा प्रथमच हसरी गॅलरी’ हे हास्य व व्यंग्यचित्र प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे 27, 28 व 29 ऑगस्टला आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन 27 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. दररोज या प्रदर्शनातील हास्य व व्यंग्यचित्रे बदलली जाणार आहेत. रोज सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे हास्यव्यंग चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
कार्यक्रमांची मेजवानी
पुणे फेस्टिव्हलमध्ये मराठी कार्यक्रमांची रेलचेल असून, त्यामध्ये मराठी कवी संमेलन, हास्योत्सव एकपात्रींचा, मराठी नाटके, शास्त्राीय गायन व नृत्य आदींचा समावेश आहे. तसेच गोल्फ कप, रोलर स्केटिंग, बॉक्सिंग, कुस्ती आणि मल्लखांब स्पर्धांचाही समावेश आहे. उगवते तारे आणि इंद्रधनू या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.