शेगावसह मलकापूर स्थानकाची सुरक्षितता वाढवणार

0

सहाय्यक महानिरीक्षक आलोक बोहरा यांची ग्वाही ; डीएससी कार्यालयाचे वार्षिक निरीक्षण

भुसावळ- मध्य रेल्वेतील शेगावसह मलकापूर या महत्वपूर्ण स्थानकाची सुरक्षा वाढवण्यासह अनधिकृत प्रवेशाचे मार्ग लवकरच बंद होतील, अशी ग्वाही आरपीएफचे सहाय्यक महानिरीक्षक आलोक बोहरा (मुंबई) यांनी भुसावळ भेटीप्रसंगी दिली. बोहरा यांनी गुरुवारी भुसावळ डीएएससी कार्यालयाचे वार्षिक निरीक्षण केले तसेच मलकापूर व शेगाव रेल्वे स्थानकाला भेट देवून पाहणी केली तसेच भुसावळ कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षा संमेलन घेवून अधिकारी व कर्मचार्‍यांची समस्या जाणून घेतल्या. रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांना तातडीने रेल्वे क्वाटर्स उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गुरुवारी सायंकाळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी ताप्ती क्लबमध्ये संवाद साधला.

मलकापूर रेल्वे स्थानकाच्या निरीक्षणाची जवाबदारी
काही दिवसांपूर्वीचे मध्य रेल्वेचे जीएम यांनी भुसावळ विभागाचा पाहणी दौरा केला होता तर मलकापूर येथे सुरू असलेल्या कामांबाबत आढावा घेण्याची जवाबदारी बोहरा यांच्यावर सोपवली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बोहरा यांनी मलकापूर रेल्वे स्थानकाला भेट देत सुरू असलेल्या कामांबाबत माहिती जाणून घेतली तत्पूर्वी शेगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करून सुरक्षेबाबत आढावा घेतला. दोन्ही रेल्वे स्थानकावर उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही बसवण्याबाबत त्यांनी दुपारून डीआरएम आर.के.यादव यांच्याशी चर्चा केली. दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थानकातील प्रवेशाचे चोरटे मार्ग लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे बोहरा यांनी सांगून नॉन आयएसएस (इंटीग्रेटेड सिस्टीम नसलेल्या) स्थानकावर लवकरच सीसीटीव्ही बसवले जात असल्याचे ते म्हणाले.

रेकॉर्डची तपासणी, सुधारणांचे आदेश
बोहरा यांनी दुपारून डीएससी कार्यालयासह संबंधित क्राईम रेकॉर्डची तपासणी करून सुधारणा करण्याचे आदेश दिले तसेच भुसावळ कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सुरक्षा संमेलनात अधिकारी व कर्मचार्‍यांची वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या तसेच अभिप्रायही जाणून घेतला. रेल्वे सुरक्षा कर्मचार्‍यांना क्वाटर्स तातडीने देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, तापी क्लबमध्ये प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना वरीष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे, एएससी राजेश दीक्षीत, रेल्वे स्थानक निरीक्षक दिनेश नायर, निरीक्षक आर.के.पाठक आदींची उपस्थिती होती.