जळगाव : शेजारी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत करण्यात आली. ही घटना शिवाजीनगर हुडको भागात घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
हेमंत गोविंदा सोनवणे (52, साईबाबा मंदिराजवळ, शिवाजीनगर हुडको, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 20 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे मनीष बिर्हाडे (शिवाजी नगर, हुडको) आणि योगेश सरदार (पूर्ण नाव माहित नाही, रा.मुंबई) यांचे आपसात भांडण सुरू होते. सुरू असलेले भांडण पाहून हेमंत सोनवणे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने योगेश सरदार आणि मनीष बिर्हाडे (रा. शिवाजीनगर हुडको) यांनी हेमंत सोनवणे यांना शिविगाळ करून मारहाण केली तर एकाने लोखंडी वस्तूने डोक्यात वार करून दुखापत केली. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रात्री 12 वाजता संशयीत आरोपी योगेश सरदार आणि मनीष बिर्हाडेयांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक ललित भदाणे करीत आहेत.