ठाणे । गेल्या काही दिवसांपासून सुरू असणार्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज ‘एनडीए’ची साथ सोडण्याची घोषणा केली. पुण्यातील अल्पबचत भवन येथे संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर येत्या 4 सप्टेंबर रोजी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देणार आहेत. तर आगामी कालखंडात संसदेवर शेतकर्यांच्या विराट मोर्चा काढण्यासह या चळवळीला बळ देण्याचा संकल्प त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपाचे अभय
पुढे विधानसभेला भाजप व शिवसेनेच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी ‘स्वाभिमानी’ भाजपसोबत राहिली. त्याची भरपाई म्हणून संघटनेच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांना कृषिराज्यमंत्रिपद देण्यात आले. ते सत्तेत गेले आणि संघटनेतील दुही सुरू झाली. खोत संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सत्तेत गेले; परंतु तिथे गेल्यावर ते सरकारचेच हस्तक बनल्याने शेट्टी व खोत यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यातून संघटनेने गेल्या महिन्यांत सदाभाऊंची हकालपट्टी केली; परंतु सत्तारूढ भाजपने मात्र त्यांना अभय देत सत्तेत कायम ठेवले. उलट महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर सदाभाऊ हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाल्याचे सांगून टाकले. त्यामुळे संघटना सत्तेतून बाहेर पडणार हे स्पष्टच होते. ती बाहेर पडते की पडणार, पडणार म्हणत सत्तेला चिकटून राहते, हीच उत्सुकता होती.
राज्य कार्यकारिणीचा निर्णय
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी झाली. यात सर्वसंमतीने केंद्र व राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. यानंतर संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. 2014 च्या निवडणुकीच्या पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने भाजपसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष अशा पाच पक्षांची महाआघाडी झाली होती. यातून आता पहिल्यांदा ‘स्वाभीमानी’ने काढता पाय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
खोतांचे काय?
भाजपने सदाभाऊ खोत यांना आपलेसे करून स्वाभीमानीत फूट पाडली होती. यामुळे गेल्या महिन्यातच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी हवे तर स्वाभीमानीला एक मंत्रीपद अजून देऊ’ अशा शब्दात गोंजारण्याचा प्रयत्न केला होता. तथापी, याला न भुलत शेट्टी यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळला आहे. तर संघटनेचे नेते रविकांत तूपकर हे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असून ते राजीनामा देणार असल्याचे शेट्टींनी जाहीर केले आहे. तर खोत हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.