सांगली- देशातील शेतकरी अडचणीत येण्याला भाजप सरकारची धोरणे जबाबदार आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. तसेच भाजप सरकारने शेतकरी विधेयके मंजूर केल्यास भाजपसोबत आम्हाला जाण्यास काही अडचण नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. ते शहरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रकमेसाठी २९ जूनला पुण्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
तर भाजपसोबत जाऊ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून युती सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळवून देण्याच्या आणि शेतकऱ्याना कर्जमुक्त करण्याच्या आश्वासनावर सत्तेत आले. मात्र ही दोन्ही आश्वासने त्यांनी पाळली नाहीत. अजूनही ही वेळ गेलेली नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात स्वामिनाथन आयोग लागू करणे आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणे ही दोन विधेयके लोकसभेत आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करावीत. असे केले तर आम्हाला भारतीय जनता पक्षाबद्दल तक्रार असायचे काही कारण नाही, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले.
दोन विधेयकाची मंजुरी आणि त्याबद्दलची स्पष्ट भूमिका हीच आमची राजकीय भूमिका असणार आहे. जोपर्यत या भूमिकेला खात्रीशीररित्या पाठींबा मिळत नाही तोवर राजकीय निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत शेट्टी यांनी आघाडीच्याबाबतीत भूमिका मांडली.
पुण्यात मोर्चा
देशातील १९३ शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे. या समितीने शेतकऱ्यांचे प्रश्न कायमचे कायदेशीररित्या सुटावेत म्हणून हे दोन कायदे तयार केलेत. या विधेयकांना या १९३ शेतकऱ्याच्या संघटनासहित २३ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभागृहात या २३ पक्षाचे खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करणार आहेत असेही शेट्टी यांनी सांगितले. साखरेच्या आणि दुधाच्या दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होत आहे. पुणे आयुक्त कार्यालयावर २९ जुनला मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. तर दूध क्षेत्रातील सध्याची परिस्थिती पाहता सरकारने किमान सहा महिने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रतिलिटर ५ रुपये जमा करावेत, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.