शेतकरी असणं गुन्हा?

0

रामेश्‍वर भुसारे
तोंडावर रक्त लागलेले.
स्पष्ट कळतं मारहाण झालेली.
ते सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञांची गरज नाही.
इतर कुणी असतं तर पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍यांविरोधात गुन्हा नोंदवला गेला असता. किमान भारतीय दंडसंहितेच्या 324 कलमाखाली गुन्हा नोंदवलाच गेला असता. किरकोळ का होईना.

पण राज्याची राजधानी मुंबईत, पुन्हा राज्य जेथून चालतं त्या मंत्रालयातच ही घटना घडूनही तसं काहीच झालं नाही. उलट झालं भलतंच. रामेश्‍वर भुसारेंवरच गुन्हा दाखल झाला. काय तर म्हणे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाई राहिली दूरच. रामेश्‍वरच गुन्हेगार ठरले. कारण… त्याचे वकील अ‍ॅड. जयेश वाणी यांच्याशी बोललो. प्रकरण माहीत होतेच. पण तरीही रामेश्‍वरची चूक असल्याचे काही सांगत होते. पण वाणींनी संपूर्ण माहिती दिली. तेव्हा लक्षात आलं की मार खाऊनही रामेश्‍वरच गुन्हेगार ठरले. कारण ते शेतकरी आहेत!

होय! जे रामेश्‍वर भुसारे मंत्रालयात न्याय मागण्यासाठी आले होते, त्यांना न्याय तर मिळाला नाहीच उलट जाताना ते एका गुन्ह्यातील आरोपीचे रेकॉर्ड मात्र तयार करून गेले. काय दोष त्यांचा? स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसेल तर मंत्रालयात येणे गुन्हा आहे का? तसे अनेक गुन्हेगारही मंत्रालयात राजरोस येत असतात. मस्त कामे करून घेऊन टेचात निघून जात असतात. त्यामुळेच वाटले की रामेश्‍वरचा गुन्हा हाच की ते शेतकरी आहेत हाच आहे की काय!

रामेश्‍वर भुसारे हे 32 वर्षांचे तरुण शेतकरी. नव्या काळात नवी स्वप्ने सर्वच पाहू लागलेत. समाज, भौगोलिक विभाग कोणताही असो. प्रत्येक तरुण-तरुणीच्या डोळ्यांत स्वप्न असते ते काही तरी वेगळे करून दाखवायचे. जसे आहोत तसेच न राहता जीवनात पुढे जायचे. अशीच स्वप्ने औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील घाटशेंद्राच्या रामेश्‍वरनेही पाहिली. आहे त्याच पारंपरिक शेतीत न रमता त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायचे ठरवले. दोन वर्षांमागे त्यांनी स्वत:च्या खर्चाने पॉलिहाऊस आणि शेडनेट उभारले. सन2015मध्ये 11 आणि 12 एप्रिल असे दोन दिवस त्यांच्या गावच्या परिसरात गारपीट झाली आणि सारे होत्याचे नव्हते झाले.

रामेश्‍वरसाठी तसे सारेच संपले. पण त्याने हार मानली नाही. त्याने पुन्हा उभे राहायचे ठरवले. रामेश्‍वरने या नुकसानीची माहिती संबंधित सरकारी अधिकार्‍यांना कळवली. त्यांनी नुकसानभरपाईचे आश्‍वासन दिले. मात्र, ती कधीच मिळाली नाही. रामेश्‍वरने स्थानिक पातळीवर अगदी कृषी अधिकार्‍यांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत प्रयत्न केले. पण आश्‍वासनांपलीकडे काहीच मिळू शकले नाही. उलट नुकसानभरपाईच्या यादीतून आपले नाव गायब झाल्याचा आरोपही रामेश्‍वर करतात. त्यानंतर रामेश्‍वरने मंत्रालयात चकरा मारणे सुरू केले.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना त्याने 30 सप्टेंबर 2016 रोजी अर्ज दिला. ते स्वत: मान्य करतात. त्यांनी रामेश्‍वरना अनुदानाचे आश्‍वासनही दिले. त्यानंतरही काही झाले नाही. 4 ऑक्टोबर 2016 रोजी रामेश्‍वरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन समस्या मांडली. कृषी खात्याशी झालेला पत्रव्यवहारही जोडला, तरीही काही झाले नाही. अखेर त्याने पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे नोव्हेंबरमध्ये अर्ज केला. 9 नोव्हेंबर 2016 रोजी साकडे घातले. पण झाले काहीच नाही. त्यांनी थेट पत्र लिहून आत्महत्येची परवानगीही मागितली, तरीही कुणी दखल घेत नाही म्हटल्यावर ते अखेरच्या प्रयत्नांसाठी मंत्रालयात आले.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर रामेश्‍वर पोहोचले. तेथे ते मुख्यमंत्र्यांची वाट पाहत बसलेले असताना मंत्रालय सुरक्षारक्षकांनी हटकले. त्यात काही गैर नव्हते. पण पुढे त्यांना धक्काबुक्की झाली. रामेश्‍वरचा आरोप आहे की मला बसण्यास मनाई केल्यावर मी कुठे जायचे असे विचारल्यावर त्यांनी मला पकडले आणि घेरून लिफ्टकडे घेऊन गेले. लिफ्टमध्ये मला मारहाण केली. त्यानंतर अक्षरश: लिफ्टमध्ये कोंबले. यादरम्यान, माझ्या ओठातून मारहाणीने रक्त येऊ लागले, तर त्यांनी माझे डोके गाडीत रुमालाने दाबून धरले. पोलीस ठाण्यात आणल्यावरही कुणाशी काही बोलू नको, असे धमकावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार, शेकापचे नेते जयंतराव पाटील पोलीस ठाण्यात गेले नसते तर रामेश्‍वरला आणखी त्रास झाला असता. त्यानंतरही जयेश वाणी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्यावर पोलिसांनी फोकनाड कारणे देऊन सुटका लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवले गेल्याने पोलिसांना रामेश्‍वरची सुटका करावी लागली. रिकाम्या हाताने आलेला रामेश्‍वर जाताना एका गुन्ह्यातील आरोपी असल्याचे कागदपत्र सोबत घेऊन गेला.

रामेश्‍वरसारखीच पाळी नेहमीच शेतकर्‍यांवर, कष्टकर्‍यांवर येते. सरकार कुणाचेही असो. मुर्दाड नोकरशाही कुणाचीच नसते. तिच्यासाठी मंत्रालयात कामे घेऊन येणारे दलाल हे सर्वात मोठे असतात. जे लक्ष्मीदर्शन घडवू शकतात त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाला मंत्रालयात येण्याचा अधिकारच नसावा, अशीही काहींची इच्छा असावी. उगाच साले गर्दी करतात आणि सौद्यांमध्ये अडथळे आणतात! रामेश्‍वर दलालांच्या मार्गातील अडथळाच!

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मावळला पोलीस गोळीबारात शेतकर्‍यांचे बळी गेले. रामेश्‍वरविषयी बोलले तर भाजपचे काही भक्त अंगावर आले. त्यांच्या काळात तर गोळीबार झाला. त्यांची तर तेव्हा सालटी काढली होती. सर्वात महत्त्वाचे… काँग्रेस-राष्ट्रवादीवाले माजले. त्यामुळेच तर सामान्य मतदारांनी सत्ताबदल घडवला. भाजपला सत्तेवर आणले. आता भाजपच्या सत्तेतही शेतकर्‍यांवरच हात उचलला जाणार असेल, तर तेही माजले असेच म्हणावे लागेल. लोकशाहीमार्गाने बदल घडवण्यावरचा विश्‍वासच उडेल. तसे घडू नये. एवढीच अपेक्षा.

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर हल्ला करणार्‍या धर्मांध जमावावर ज्यांनी कारवाई केली त्या पोलीस अधिकार्‍याची गेल्या आठवड्यात बदली झाली. येथे सामान्य शेतकर्‍याला मारहाण करणार्‍यांवर कारवाई दूरच उलट त्यांनाच आरोपी केले गेले. हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही पुढचे चालले आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यांनी स्वत: लक्ष घालावे. असे घडणे चांगले नाही. शेतकरी असणे हा शिवरायांच्या महाराष्ट्रात गुन्हा असू नये! रयतेच्या काडीलाही हात लावू नये अशी तंबी देणार्‍या छत्रपतींच्या आशीर्वादाने सत्तेवर आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांचा पक्ष करत असतो, त्या शिवरायांना शेतकर्‍याला हात लागलेले कदापि चालले नसते.

– तुळशीदास भोईटे