पिंपरी-चिंचवड। नागरिकांना आपल्या घराजवळच स्वस्त ताजा भाजीपाला मिळावा, शेतकर्यांनाही आपला शेतमाल स्वत: विक्री करता यावा, या उद्देशाने पिंपळे सौदागर येथील नीलेश काटे युवा मंचच्या वतीने पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर स्कूलजवळ रविवारी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेदरम्यान, शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात आला होता. या आठवडे बाजाराच्या माध्यमातून येथील स्थानिक नागरिकांना घराजवळच वाजवी दरात स्वच्छ, ताजा भाजीपाला मिळाला. या बाजारात भाजीपाला, धान्य खरेदी करण्यासाठी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आता यापुढेही दर रविवारी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेदरम्यान हा शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे.
नागरिकांकडून स्वागत
पिंपळे सौदागर हा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे. याठिकाणी विविध प्रकारचे मॉल्स, मल्टीप्लेक्स, अनेक कंपन्यांचे शोरुम्स, हॉटेल्स आहेत. परंतु भाजीपाला, धान्य घेण्यासाठी नागरिकांना भाजीमंडईत जावे लागते. नागरिकांना हा त्रास होऊ नये, तसेच शेतकर्यांनाही त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नीलेश काटे युवा मंचतर्फे महाराष्ट्र शासन कृषी विभाग नोंदणीकृत लक्ष्मण कृषी बचतगट आयोजित आठवडे बाजार भरवला जाणार आहे. ही संकल्पना चांगली असून तिचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. आठवडे बाजाराची संकल्पना नागरिकांच्या सोयीसाठी मांडली असून, तिला चांगला प्रतिसाद लाभल्याचे नीलेश काटे यांनी सांगितले.