शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत द्या – ना. गुलाबराव पाटील

0

जळगाव । शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांच्या आर्थिक मदतीच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करुन त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी सुचना सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्याभरात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांना तत्काळ प्रशासने मदत करावी. तसेच उपाय योजना राबविण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचित केले.

वसंत महाजन यांची मदत
रावेर येथील वसंत लक्ष्मण महाजन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 हजार रुपयांची मदत केली असून या रक्कमेचा धनादेश महाजन यांनी ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मान्यवरांनी त्यांनी दिलेल्या योगदानाचे
कौतुक केले.

आत्महत्याग्रस्त 14 प्रकरणांना मंजुरी
शासनाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हातभार लागवा म्हणून शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्याची बैठक ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना आर्थिक मदतीची एकूण 18 प्रकरणे विचारार्थ ठेवण्यात आली. त्यापैकी 14 प्रकरणे मंजूर करण्यात आली तर 2 प्रकरणे अपात्र, 1 प्रकरण प्रलंबित तर 1 प्रकरणावर फेरविचार करण्याचे ठरले आहे.

यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना आर्थिक मदत देणेसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, सामाजिक संस्था प्रतिनिधी वसंत लक्ष्मण महाजन यांचेसह जिल्हयातील विविध पंचायत समितीचे सभापती, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.