जळगाव । तकरी आत्महत्येसाठी राजकीय व्यवस्था व कॉर्पोरेट लॉबी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार आहे असा आरोप मू. जे. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जयवंत मगर यांनी केले. मू.जे. महाविद्यालयातील अर्थशास्त्र व नियोजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतातील कापसाचे कृषी अर्थशास्त्र आणि कापूस उत्पादक शेतकर्यांची आत्महत्या या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.
सरकारकडून होणारा वित्तपुरवठा घट
देशातील प्रमुख कापसाच्या जाती व त्या जातीचे लागवड क्षेत्र व त्यांना लागणारा उत्पादन खर्च याविषयी मार्गदर्शन केले. या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, सन 1998-99 पासून देशात कापूस उत्पादक शेतकर्याच्या आत्महत्या व्हायला सुरुवात झाली. कारण सरकारकडून होणारा वित्तपुरवठा घटत गेला व कापूस उत्पादनाविषयीचे चक्र व याबाबतीत सरकार व शेती संशोधन संस्था यांनी पद्धतशिरपणे डोळेझाक केलेली आहे. कापूस उत्पादित करताना साधारणपणे दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापसाची झाडे नष्ट केली पाहिजेत कारण ते जर नष्ट केले नाही तर कापसावरील बोंड अळीची अंडी जिवंत राहतात व पुढच्या वर्षी ती पुन्हा कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, असे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. महेश बडवे यांनी विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधनावर भर द्यावा याबद्दल मार्गदशन केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार नियोजन मंडळाचे चेअरमन प्रा.डी.आर.वसावे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश बडवे, डॉ. एन.एस. बोरसे व नियोजन मंडळाचे चेअरमन प्रा.डी.आर.वसावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन.एस. बोरसे, सूत्रसंचालन डॉ.एल.एन.तायडे व आभार प्रदर्शन प्रा.डी. आर.वसावे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
हेतुपुरस्सर उपाय योजना नाही
बोंड अळीवरील उपाय म्हणून जी जंतूनाशके जी बाजारात विकली जातात ती जंतूनाशके खरतर ती हिरव्या बोंड अळीवरील उपाय आहे पण भारतात तीच जंतूनाशके लाल रंगाच्या बोंड अळीवर वापरतात म्हणजे आजार मलेरियेचा व औषध मात्र टायफॉईडचे दिले जाते अशी विपरीत परिस्थिती आहे. ही सर्व माहीती तलाठी, ग्रामसेवक ते कृषीमंत्री या सर्व प्रशासनातील घटकांना माहित असूनसुध्दा ते याविषयी कुठेही बोलत नाहीत, कारण याच्यामागे राजकीय व्यवस्था व कॉर्पोरेट लॉबी यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, असाही आरोप त्यांनी केला.