मुंबई:- अधिवेशनाच्या काळात चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या बाबतीत शासनाकडून अध्यादेश काढून देखील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने विधानसभेत अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध करताना राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. या दरम्यान संपूर्ण चर्चेदरम्यान एकही अधिकारी उपस्थित नव्हता हे विशेष. या दरम्यान विरोधी पक्षातील सदस्य हे अध्यक्षांना अधिकारी उपस्थित नसल्याबाबत वारंवार खुणावत होते.
अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी चर्चा थांबवित अधिकाऱ्यांना तंबी दिली. पहिल्यांदा बघतोय अधिकाऱ्यांची गॅलरी रिकामी पाहतोय असे सांगत फक्त टीव्हीवर बघून उपयोग नाही. सभागृहाचा मान राखावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. विशेष म्हणजे अधिवेशन काळात महत्वाच्या चर्चेला उपस्थित राहण्याबाबत शासन आदेश काढून सुद्धा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा किंवा सरकारचा वचक राहिलेला नसल्याची चर्चा यावेळी रंगली.