मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीत सर्वाधिक शेतकरी बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून त्यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. यवतमाळमधील दोन लाख 42 हजार 471 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. मुंबईतही लाभार्थी शेतकरी सापडले असून ही संख्या तब्बल ८१३ आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबतची सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून सोमवारी जाहीर केली आहे. बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांनंतर बीड, नगर, जळगाव, पुणे, अमरावती, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे.
विशेष म्हणजे, देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरातील ८१३ शेतकऱ्यांचा यात समावेश असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा त्यांनाही मिळणार असे दिसते. दीड लाख रूपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्य सरकारने जाहीर केली आहे. यात एकरकमी परतफेड योजना, प्रोत्साहनपर अनुदान योजना आणि कर्ज पुर्नगठण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्हानिहाय शेतकरी संख्या
अहमदनगर – 2 लाख 869, औरंगाबाद – 1 लाख 48,322, बुलडाणा – 2 लाख 49,818, गडचिरोली – 29 हजार 128, जळगाव – 1 लाख 94,320, लातूर – 80 हजार 473, नागपूर – 84 हजार 645, परभणी – 1 लाख 63,760, रत्नागिरी – 41 हजार 261, सिंधुदुर्ग – 24 हजार 447, वाशिम – 45 हजार 417, अकोला – 1 लाख 11,625, बीड – 2 लाख 8 हजार 480, चंद्रपूर – 99 हजार 742, गोंदिया – 68 हजार 290, जालना – 1 लाख 96,463, मुंबई शहर – 694, मुंबई उपनगरे – 119, नांदेड – 1 लाख 56,849, उस्मानाबाद – 74,420, पुणे – 1 लाख 83 209, सांगली – 89 हजार 575, सोलापूर – 1 लाख 8,533, यवतमाळ – 2 लाख 42,471, अमरावती – 1 लाख 72,760, भंडारा – 42 हजार 872, धुळे – 75 हजार 174, हिंगोली – 55 हजार 165, कोल्हापूर – 80 हजार 944, नंदुरबार – 33 हजार 556, पालघर – 918, रायगड – 10 हजार 809, सातारा – 76 हजार 18, ठाणे – 23 हजार 505.