शेतकरी कर्जमाफीला मुख्यमंत्री सहायता निधीचा टेकू

0

मुंबई : राज्यामध्ये घोषित केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या घोषणेनंतर आता यासाठी लागणाऱ्या निधीची तजवीज करताना सरकारच्या नाकेनऊ आले असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी येनकेनप्रकारेण राज्य सरकारने निधीची जुळवा जुळव सुरू केली आहे. या निधीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर करता यावा म्हणून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अकरावे उद्दिष्ट म्हणून शेतकरी कर्जमाफीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा हातभार लागणार आहे.

घोषणेपासून आकड्यांच्या घोळात अडकलेल्या या कर्जमाफीच्या निधीचा डोंगर सर करणे सरकारसमोर आव्हान आहे. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी सरकारला निधीची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. यामुळे सरकारने एक पाऊल पुढे करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कर्जमाफीसाठी निधी देण्यासाठी अकरावे उद्दिष्ट म्हणून शासन निर्णय काढला आहे.

कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शासकिय योजनेला अर्थसहाय्य करणे असे अकरव्या उद्दिष्ट्याचा सामावेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये करण्यात आले आहे. सहायता निधीमध्ये मदतीसाठी सरकारतर्फे आवाहन देखील करण्यात आले आहे.