पिंपरी-चिंचवड : शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी पेटवलेले रान, शिवसेनेसोबत बिघडलेले राजकीय संबंध आणि राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यश या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उहापोह झाला. कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल असल्याची भूमिकाही यावेळी मांडण्यात आली. कर्जमाफीचा ठराव घेतला जाण्याची शक्यता पक्षसूत्राने व्यक्त केली. बुधवार (26) पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीस प्रारंभ झाला. सकाळी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे व प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याहस्ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ना. गडकरी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रसारमाध्यमांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते.
800च्या आसपास नेत्यांची उपस्थिती
राज्यात शेतीविषयक निर्माण झालेल्या समस्या, शेतकरी कर्जमाफी आणि या प्रश्नांवरून विरोधकांनी पेटविलेले रान या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे पक्षसूत्राने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. या विजयाबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्रिमंडळाचा विस्तार, शेतकर्यांना कर्जमाफी, शिवसेनेसोबतचे राजकीय संबंध आणि विरोधकांच्या संघर्षयात्रेला प्रत्युतर देण्यासाठीची रणनीती आदी मुद्दे या बैठकीत प्रामुख्याने चर्चिले जाणार असल्याचेही सूत्र म्हणाले. पक्षाचे पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री यांच्यासह पक्षाचे कार्यालयप्रमुख अशा 800च्या आसपास नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली आहे.
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे स्वागत
बैठकीच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे स्वागत केले. तब्बल 33 वर्षानंतर उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत असल्याने संपूर्ण शहर भाजपमय झाले होते. बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता, त्यामुळे बैठकीतील निर्णयांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील एवढेच सांगितले जात होते.